दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करीत असताना, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या सोमवारी, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता जालना विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.
जालना तालुक्यातील मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी, शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, पशुधनासाठी चाऱ्याची समस्या, रोजगाराचा प्रश्न आणि आर्थिक संकट यांसह विविध समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर परिसरातील शेतकरी कुटुंबांसोबत दीपावली साजरी करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार आहेत.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी दुष्काळाच्या संकटामुळे अनेक शेतकरी कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतातील उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतमजुरांच्या रोजगारावर, तसेच ग्रामीण भागातील छोटे व्यापारी व व्यावसायिकांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. ज्यांना शेतीच नाही केवळ मजुरी करून अथवा छोटा मोठा व्यवसाय करून पोट भरतात अशा लोकांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेणे, त्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे आणि त्यांना आधार देणे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
दिवाळीच्या आनंदापेक्षा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातील चिंता दूर होणे अधिक महत्त्वाचे आहे. याच भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी कुटुंबांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणींवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा करणार आहेत.
या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शिवसेना उपनेते, माजी मंत्री तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
“दुष्काळामुळे आपल्या बळीराजाच्या घरातील दिवाळीचा आनंद हिरावला गेला आहे. अशा वेळी त्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या व्यथा ऐकणे आणि त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शेतकरी कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असून या भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास खोतकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचा तपशील
– दिनांक :सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६
– वेळ : दुपारी २.०० वाजता
– स्थळ : श्री रामेश्वरी महादेव संस्थान, मौजपुरी, ता. जि. जालना
– प्रमुख उपस्थिती : एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Marathi e-Batmya