अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर त्यांच्या विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेच्या खासदारांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यासाठीही आस्ते कदम ठेवले जात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनाही अशाच पध्दतीने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहिर करण्यात आली. अगदी त्या पध्दतीने आणि कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सोडावा यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. तसेच या मतदारसंघातून शेवटच्या क्षणी किरण सामंत यांनीही भाजपाच्या तिकिटावर लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना चांगली लढत देणारा उमेदवार काही केल्या भाजपाला मिळत नव्हता. परंतु राज्यातील शिवसेना उबाठा गटाचे राजकिय अस्तित्व आणि नारायण राणे यांची त्यांच्या विरोधातील उपयुक्तता पहात भाजपाने पुन्हा एकदा नारायण राणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर केल्याचे सांगण्यात येत आहे.

वास्तविक पाहता नारायण राणे यांचे आतापर्यंतचे राजकिय इतिहास पाहता काँग्रेसमध्ये आणि आता भाजपामध्येही शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक म्हणूनच त्यांची राज्याच्या राजकारणात महत्व राहिले आहे. परंतु मध्यंतरी राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश करत राज्यसभेवर खासदार म्हणून निवडूण देण्यात आले. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगाचे मंत्री पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली.

या मंत्रिपदाच्या निमित्ताने नारायण राणे यांना राष्ट्रीय पातळीवर वेगळा ठसा उमटविण्याची संधी आयती चालून आली होती. मात्र ती आयती चालून आलेली संधी नारायण राणे यांनी वाया घालविली अशी चर्चा राज्याच्या राजकारणात अर्थात भाजपाच्या अंतर्गत राजकारणातच सुरु झालेली आहे. त्यामुळे यंदा जवळपास १० वर्षाच्या अंतराने नारायण राणे हे स्वतः निवडणूकीच्या राजकारणात उतरत आहेत. यापार्श्वभूमीवर कोकणातील जनता नारायण राणे यांना स्विकारणार का की पुन्हा एकदा विनायक राऊत यांच्या पाठिशी उभी राहणार हे आगामी काळातच पाह्यला मिळेल.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *