विधान परिषदेच्या ४ जागांसाठी एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध शिवसेना उबाठाकडून संकल्प पत्र जाहिर होणार

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती विधान भवनाने दिली.

या निवडणुकीकरिता उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज सोमवार, १० जून २०२४ रोजी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक संकल्पपत्राचे विमोचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्या बुधवारी १२ जून २०२४ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम मातोश्री येथे उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. याद्वारे अनिल परब हे त्यांच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परब यांनी ३ जून रोजी शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला.

निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *