वसई- विरार मधील बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार, महायुती सरकार यांच्यावर विश्वास ठेवून या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवू. वसई-विरार परिसराच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसई-विरार, नालासोपारा परिसरातील नागरी प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत. या परिसराच्या विकासाला वेगळी दिशा देऊन पारदर्शक कारभार करू अशी ग्वाही दिली. या परिसरातील समस्या दूर करून सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी केंद्र आणि राज्यामध्ये एक विचारांचे सरकार प्रयत्नशील आहे. आणि आता महेश पाटील यांसारखे जनतेच्या समस्यांची जाण असलेले कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेल्याने या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील असेही त्यांनी नमूद केले.
बविआ मधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष राजेश ठाकूर, महिला झोपडपट्टी आघाडीच्या अध्यक्ष सविता ठाकूर, रवी पाटील, राजेश पाटील, दिलीप भोईर, हर्ष म्हात्रे, युवाप्रतिष्ठानचे धवल चोरघे आदींचा समावेश आहे.
Marathi e-Batmya