काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते शुक्रवारी चिपळूणच्या धवल घाग व्यापारी संकुल येथे झाला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील, माजी आ. हुस्नबानो खलिफे, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, ज्येष्ठ नेते रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर सिंग बच्छर, शशांक बावचकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांच्यासह प्रशिप्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या प्रशिक्षण कार्यशाळेत तीन दिवस विविध विषयांवर विचार मंथन केले जाणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कोकणात अपेक्षित यश मिळाले नसले तरी सरकारी यंत्रणांचा गैरवापर, दडपशाही, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर अशा विपरीत परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या निर्धाराने लढा दिलेला आहे. यापुढे कोकण विभागात काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न करा, असे सपकाळ म्हणाले.
माजी खासदार हुसेन दलवाई यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेने जात, धर्म, गरिब, श्रीमंत, महिला पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. भाजपा सरकारच्या कारभारावर टीका करताना दलवाई म्हणाले की, राज्यातील सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. एकीकडे शिक्षणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकारी रुग्णालयाची अवस्था केविलवाणी झाली आहे. सर्वसामान्य लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पराभवाला न घाबरता लढले पाहिजे, लोकांपर्यंत जावा असे आवाहन दलवाई यांनी केले.
राज्यसभा काँग्रेसने तर विधान परिषद शिवसेनेने लढवावी..
यावेळी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाची भूमिका पाहता राज्यसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी व मविआचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक मविआकडून लढवावी, असे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. ज्या पद्धतीने सरकार ही घटना हाताळत आहे ते पाहता काहीतरी काळंबेरं आहे अशी शंका निर्माण होत आहे. अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय उड्डाण मंत्र्यांना पत्र पाठवले व केंद्रीय मंत्र्यांचे त्याला उत्तर आले त्यानंतर त्यावर काहीच घडत नाही. या अपघातीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. रस्ते अपघात झाला तरी गुन्हा नोंदवला जातो पण उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाची चौकशी करण्यासंदर्भातील एफआयआरही नोंदवून घेतला जात नाही, हे आश्चर्यकारक आहे, असे सपकाळ म्हणाले.
दिल्ली एक्साईज पॉलिसी प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने निर्दोष ठरवल्याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे विरोधी विचारधारेच्या पक्षातील नेत्यांशी सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर कसा करते, हे पुन्हा उघड झाले आहे, असेही सांगितले.
प्रदेश उपाध्यक्ष अड. गणेश पाटील यांनी कार्यशाळेच्या उद्देशाबद्दल सविस्तर विवेचन केले तर प्रास्ताविक आशुतोष शिर्के यांनी केले.
Marathi e-Batmya