काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
सातारा दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष संपेल असा विचार जे लोक करत असतील त्यांना देशाचा इतिहासच माहित नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांचा मान ते राखत नाहीत व त्यांची किंमतही त्यांना कळलेली नाही. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या दोन पंतप्रधानांचे बलिदान झाले, हे ते विसरतात. महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या अतिरेक्याला ते विसरतात. अशी वक्तव्ये करणे म्हणजे राष्ट्रद्रोह असू शकतो का, असा प्रतिप्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची यशवंतराव चव्हाणांना आदरांजली..
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन काँग्रेस पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना सपकाळ म्हणाले की, आज देशावर संकट आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याची आज आठवण झाली. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता या ६० च्या दशकातील इतिहासाचे स्मरण केले, त्यावेळी विपरित परिस्थितीत भारत निकराने लढला व विजयी झाला, त्यांच्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून आपण आज पुन्हा भारतीय लष्काराच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. चव्हाण साहेबांच्या खंबीर नेतृत्वाचा जो बाणा होता त्याचा पुर्नजन्म होईल व भारतीय लष्कर मोहिम फत्ते करील याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला, त्यांच्या आचार विचारांची आठवण झाली. सार्वजनिक जीवनात वावरताना राजकारण्यांनी कसे बोलावे, वागावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे त्याची आठवण झाली. प्रांताध्यक्ष नात्याने काँग्रेस पक्ष पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्र धर्माचा सभ्य, सुसंस्कृत राजकारणाचा नेमकेपणाने गाभा व दिशा काय असावी याचे स्मरण केले, असेही सपकाळ यांनी सांगितले.
लाड व कदम कुटुंबियांची सांत्वनपर भेट
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कन्या, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या भगिणी व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी भारतीताई लाड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे जाऊन लाड व कदम कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि भारतीताईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
Marathi e-Batmya