हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, मनरेगातील गांधींचे नाव व कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस कटिबद्ध काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिवस टिळक भवन मध्ये उत्साहात साजरा

देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यालय टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, राजन भोसले, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, श्रीरंग बरगे, जोजो थॉमस यांच्यासह सेवादल व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले पण व्यवस्था परिवर्तनाची लढाई अद्याप सुरुच आहे. राजसत्ता व धर्मसत्ता मूठभर लोकांच्याच हातात असावी हा भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार असून हा देश सर्वांचा आहे. सत्ता, संपत्तीवर सर्वांचा अधिकार आहे हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. काँग्रेसचा विचार संविधानाचा विचार आहे. आपला विचार अध्यात्मिक आहे, जगाच्या कल्याणाचा विचार आहे. तर भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान आहे, स्पृश्य-अस्पृश्यतेचा विचार आहे, या विचाराविरोधात काँग्रेसचा विचार आहे. आपल्या विचाराला त्याग व बलिदानाची परंपरा आहे आणि आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत याचा अभिमान बाळगा असे आवाहनही यावेळी केला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ओजस्वी यश मिळाले आहे. सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड पैसा, प्रशासन, निवडणूक आयोगाची मदत व दडपशाही होती पण त्यासमोर काँग्रेसचा कार्यकर्ता झुकला नाही, दबला नाही तर ताठ मानेने उभा राहिला, हाच बाणा कायम ठेवा. ‘लढेंगे और जितेंगे’, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘मनरेगा’ बचाव अभियानाची शपथ दिली.

“महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) कोणत्याही किंमतीवर आम्ही संरक्षित करू. ‘मनरेगा’ ही केवळ शासकीय योजना नसून, भारतीय संविधानाने कल्पिलेल्या रोजगाराच्या हक्काचे मूर्त स्वरुप आहे. आमची प्रतिज्ञा आही की, भारतातील ग्रामीण कामगारांचा सन्मान, रोजगार, न्याय व वेळेवर मोबदला मिळावा यासाठी आम्ही सामुहिक संघर्ष करू. मागणीवर आधारीत रोजगार पद्धत आणि ग्रामसभेची स्वायत्तता आम्ही अबाधित ठेवू. तसेच आम्ही ठरवतो की, मनरेगा मधून महात्मा गांधींचे नाव काढून टाकण्याच्या व कामगारांच्या हक्क व सरकारी दानात रुपांतरीत करण्याच्या प्रयत्नांना आम्ही सर्व लोकशाही मार्गाने विरोध करू. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही मनरेगा आणि भारतातील कामगारांचे हक्क जपू आणि हा आवाज शेवटच्या गावापर्यंत पोहोचवू” अशी शपथही यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *