हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते, तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज टिळक भवन, दादर येथे संपन्न झाली.या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री खा. चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, बी.एम. संदीप, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रफुल्ल गुडधे पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते आ. अमिन पटेल, माजी मंत्री रणजित कांबळे, सुनिल देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका १५ तारखेला जाहीर झाल्या आणि त्यावेळसच नियोजनासाठी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती, निवडणुक व्यवस्थापन व उमेदवार निश्चित करण्यासाठी यावेळी रणनिती ठरवली होती. आज २८ महानगरपालिकांसाठी राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली, जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन पक्ष पातळीवर एक महत्वाचा टप्पा आज पार पडला आहे. सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन तिकिट वाटपाची चर्चा करण्यात आल्याचे यावेळी सांगितले.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष नात्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. संघटनेच्या नेत्यांना तशा सुचना दिल्या आहेत, याशिवाय कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. असे उत्तर मनसेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.

तसेच हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही. पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकेटश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवलेली असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *