हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, फडणवीस, शिंदे, पवार ……महागात पडेल कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता अजित पवारांनी दमदाटी केली, ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नाहीत, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना समितीची आठवण आली नाही का? राज्याची आर्थिक परिस्थिती दिसली नाही का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सकारकडे निधी नाही तर अदानी अंबानीसाठी लाखो करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कोठून? शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का? असा सवालही यावेळी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा युती सरकार हे फक्त अदानी अंबानीसाठी पायघड्या घालते पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सुरजागडच्या खदानीमधून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तीपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरु आहे. सत्तेतून मलाई खाता आणि शेतकरी व भगिनींना देण्यासाठी पैसे कसे नाहीत..असा सवालही यावेळी केला.

हर्षवर्धन सपकाळ शेवटी बोलताना म्हणाले की, राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी शहांकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, तेवढी तरी हिम्मत दाखवा. समितीचा खेळ करू नका व तातडीने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या. शेतकरी, भगिनी व जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका ते महागात पडेल, असा इशाराही यावेळी केला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *