अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागासवर्गीय समाजाचा आक्रोश पोहचवण्यासाठी शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आल्याचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
शेतक-यांच्या प्रश्नांवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली कमळनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. सकाळी माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, एस.सी. सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे, डॉ. सतीश पाचपुते, सुरेंद्र घोडजकर, मुजाहिद पठाण, आरिझ बेग, हिंगोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वर्धा ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा कोणाच्याही फायद्यासाठी नसून गडचिरोलीतील खनिज विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाहतूक सुलभ करता यावी यासाठी हा महामार्ग केला जात आहे. हा महामार्ग पुंजीपतींसाठी टाकलेले रेड कार्पेट आहे. या महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही व सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. कंत्राटदारांची बिले थकली आहेत, पगार करायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासही सरकारकडे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत सरकारच्या लाडक्या पुंजीपतीसाठी ८८ हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग बनवला जात आहे, हे दिवाळखोरीचे लक्षण आहे. राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नये…
आखाती युद्धामुळे एलपीजी गॅस महाग झाल्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल वा गॅसच्या किमती कमी झाल्या तर त्य़ाचा फायदा सरकार ग्राहकांना देत नाही मात्र तुटवडा निर्माण झाला की कांगावा करत पूंजीपतीसाठी भाव वाढ करते, त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होतो. युद्धामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडे काही नियोजन नाही, आंतरराष्ट्रीय निती, धोरण नाही. केंद्र सरकारने डोळे उघडून बघावे, संसदेत चर्चा करावी, विरोधी पक्षांशी बोलावे. अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नये, ताठ मानेने इभे रहावे, सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहिल, असेही सांगितले.
कळमनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रेचा समारोप जाहीर सभेने झाला.
Marathi e-Batmya