मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक: प्रतिनिधी

देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही. आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. आणि त्या निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणू त्यावेळी ही लढाई संपेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळसाहेबांनी अभ्यास करून मंत्रिमंडळात मांडणी केली. आज ओबीसी आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. इम्पिरिकल डेटाची मागणी करुनही केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे यावरुन हे सरकार ओबीसीविरोधात किती आहे हे लक्षात येते असा आरोपही त्यांनी केला.

ईडीचा गैरवापर करण्यात आला त्याचं उदाहरण भुजबळ आहेत. भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका कळावी यादृष्टीने ही परिवार संवाद यात्रा असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

पक्षाची प्रगती करायची असेल तर २८८ मतदारसंघापर्यत गेले पाहिजे. या मतदारसंघात निवडणूक लढवली की नाही यापेक्षा कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे माझं काम आहे. बर्‍याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मौलिक सूचना केल्या आहेत. त्याचा विचार पक्ष नक्की करेल. सरकारची कर्जमाफी व भुजबळसाहेबांची शिवभोजन थाळी लोकप्रिय झाली आहे. गरीबातील गरीब माणसाचे किती आकर्षण या योजनेकडे आहे हे लक्षात येते. सरकारने ज्या योजना केल्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम आपल्याला करायचे असल्याची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

पक्षाचे मेळावे घेऊन प्रबोधन करणारी टिम तयार करण्यात आली आहे. ती टिम मार्गदर्शन करेल. बुथ कमिट्यांची रचना तळागाळात पोचवण्याची गरज आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा या आमदारकीचा पाया आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करुया असे आवाहन ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती उभी करायची आहे. आपण स्वतःची ताकद उभी करा ज्यामुळे आपण आपल्या ताकदीवर निवडून येऊ. इगतपुरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असेही भुजबळ म्हणाले.

इगतपुरी विधानसभा आणि नाशिक ग्रामीण मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये घेतला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आपले विचार मांडले.

या संवाद यात्रेला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी खासदार देविदास पिंगळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *