मागील अनेक वर्षापासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सातत्याने शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर हाच मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. तसेच दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या आई वडिलांनी २५ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तिच्या वडिलांनी दिशाच्या खूनामध्ये विधानसभेचे सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली असल्याचा दावा करत आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का? असा सवाल औचित्याच्या मुद्याद्वारे आज शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी विधानसभेत केला. विशेष म्हणजे याच संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपावर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविरोधात भूमिका मांडली होती.
त्यानंतर भाजपाचे आ. राम कदम म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात अजूनही विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी चालू आहे. ही चौकशी होत असतांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूत प्रकरणातील ठाकरे सरकारची भूमिका काय आहे, यावर चौकशी झाली पाहिजे. दिशा सालियान प्रकरणातील ‘एस्.आय.टी.’ने सुशांत सिंग रजपूत प्रकरणाची चौकशी करावी. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारचे पोलीस येथे आल्यानंतर त्यांना कोणी अडवले? सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर उद्धव ठाकरे सरकारने त्याच फ्लॅटला रंगरंगोटी करून तो मूळ मालकाला परत केला होता, तेव्हा पहिल्या दिवसापासून हे प्रकरण चौकशीसाठी त्यांनी ‘केंद्रीय अन्वेषण पथका’ला (‘सीबीआय’ला) का दिले नाही? बिहार पोलिसांना चौकशी का करू दिली नाही? उद्धव ठाकरे सरकारने या प्रकरणाचे पुरावे नष्ट केल्यानंतर ‘सीबीआय’ला चौकशी करण्याची अनुमती दिली होती, असा आरोपही यावेळी केला.
दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे राजीनामा देणारा का, असा आमचा प्रश्न आहे.
मा. संजय गायकवाड, आमदार#Shivsena #JusticeForDisha #SanjayGaikwad pic.twitter.com/yv4qlRsycU
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 26, 2025
त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात बोलायला उभे रहात म्हणाले की, दिशा सालियानच्या वडिलांनी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणात माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही. या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाच्या वतीने (एस्.आय.टी) चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची तिच्या वडिलांनी पोलिसांना अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. ज्यांच्यावर आक्षेप आहे, त्याविषयी पोलीस आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ५ वर्षांपूर्वीचे प्रकरण असले, तरीही वडील मुलीसाठी न्याय मागतात. तिच्या वडिलांनी २५ मार्च रोजी जी अधिकची माहिती पोलिसांना दिली, त्याचा संदर्भ सुशात सिंग राजपूत खटल्याशी असल्याचे सांगितले.
दिशा सालियन प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा होईल ही राज्य सरकारची भूमिका आहे. नैतिकतेच्या आधारे आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्यावा की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.
मा. शंभुराज देसाई, पर्यटनमंत्री #Shivsena #JusticeForDisha #ShambhurajDesai pic.twitter.com/pV8nvJAK9C
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 26, 2025
पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना आम्हाला सांगितले होते की, कुणावरही अन्याय करायचा नाही. माता-भगिनींवर तर बिलकूल नाही. त्यामुळे आम्हाला आजही ती शिकवण आहे. आम्ही ‘सीबीआय’ला आव्हान देत नाही. आपण जर काही केले नसेल, तर चौकशी करू नका असे म्हणणे योग्य नाही. ‘दूध का दूध पाणी का पाणी’ हे केले जाईल. जाणीवपूर्वक कोणावरही कारवाई केली जाणार नाही. चौकशी अहवालात सत्य समोर येईल, असेही यावेळी सांगितले.
दरम्यान शिवसेना उबाठाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुशांत सिंग रजपूत प्रकरणी वारंवार उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्या नावाची अपर्कीती करण्यात येत आहे, तरी ते रेकॉर्डवरून काढून टाकावे, अशी मागणी केली.
त्यावर मंत्री नितेश राणे यांनी ‘सीबीआय’ने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी जो अहवाल दिला आहे तो न्यायालयाने अजून स्वीकारलेला नाही. दिल्ली येथील आरुषी तलवार हत्या खटल्यातही असेच झाले आणि न्यायालयाने तो नाकारला. पुढे तो खटला पुन्हा चालू होऊन आरोपींना शिक्षा झाली. अज्ञानी लोकांनी याच्यावर बोलू नये. त्यांनी शिकून घ्यावे आणि मग यावर बोलले पाहिजे, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
दिशा सालियन प्रकरणावरुन बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी बाकावरील आमदारांनी सातत्याने दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न करत होते. तर विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. विधान परिषदेतील शिंदे शिवसेनेच्या आमदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली. विरोधी पक्षातील आमदारांनी त्यावर आक्षेप घेत गदारोळ घातला.
Marathi e-Batmya