Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, आज महाशक्ती आनंदात असेल… हिंदूस्थानात कोणाची हिंमत नव्हती पण आज त्यांनी करून दाखवलं

संपूर्ण देशात हिंदूस्थानात कोणाची हिंमत नव्हती. कोणाला करून दाखविता आल नाही. पण आज ४० तोंडाच्या रावणाने प्रभू रामचंद्राचे असलेले धनुष्य बाण चिन्ह गोठविले. त्यामुळे ती जी कोणती महाशक्ती आहे ती आनंदात असेल असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लगावला.

शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह वापरण्यास मनाई करणारा आदेश दिला. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी समाजमाध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख पुन्हा एकदा मिधे गट असा केला.

त्यांना बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झालेला नको होता. त्याना मुख्यमंत्री पद हवं होतं. म्हणून ते आणि त्यांच्यासोबत इतर ४० जण गेले. त्यांना हवं होतं ते मुख्यमंत्री पद त्यांनी मिळविलं, इथपर्यत ठिक होतं. पण आता त्यांना शिवसेना पक्षप्रमुख पदही हवं आहे. हे जरा अति होतंय. त्यांना बाळासाहेब हवेत, त्यांना त्यांची शिवसेना हवीय पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय असेही ते म्हणाले.

काही वर्षे आधी एक अमिताभ बच्चन यांची एक जाहिरात टीव्हीवर यायची. ती पाहून आपण त्या थंड पेयाची बाटली आपण विकत घ्यायचो. ती बाटली आपण फ्रिजमध्ये ठेवायचो आणि संपल्यानंतर ती बाटली आपण कोठे तरी टाकून द्यायचो. त्याधर्तीवर आता मिधे गटाचा उपयोग संपला आहे. त्यांना हवं ते त्यांनी चिन्ह गोठवून साध्य केलेले आहे. त्यामुळे आता त्यांना कुठे फेकून दिले जाईल हे त्यांनाही कळणार नाही असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

मी लहान असताना एके दिवशी घराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर एक धिप्पाड कुरळ्या केसाचा माणूस दारात उभा. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर बाळासाहेबांना सांगितलं मी दत्ताजी साळवे. काल तुमचं भाषण ऐकलं म्हणून मी नोकरी सोडून शिवसेनेचे पूर्णवेळ काम करायला आलोय. त्यावेळी तर साधं नगरसेवक पदही नव्हते कि आमदार खासदार पदही नव्हते. मुख्यमंत्री पद तर दूरचीच गोष्ट होती. त्यावेळी अशी माणसे जोडली गेली. त्या आधारावरच आज शिवसेना उभी असल्याची आठवणही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत