उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिर ओमराजे निंबाळकर -भावजय अर्चना पाटील यांच्यात लढत

उस्मानाबाद पूर्वीच्या तर आताच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अर्थात पद्मसिंह पाटील यांच्या बंधुचे सुपुत्र यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नसल्याने अखेर भाजपा आमदार राणा जगजीत पाटील यांच्या पत्नी तथा अजित पवार यांची भाची सून अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देत लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्यात नणंद भावजय यांच्यात लोकसभेसाठी लढत होत आहे. त्यानंतर उस्मानाबादमध्ये दिर-भावजय यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे बारामतीपाठोपाठ उस्मानाबाद मतदार संघातील लढत चुरशीची होणार आहे.

दरम्यान, उस्मानाबाद अर्थात धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणाही केली.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली. या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे. मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्विटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केल्याचा आरोपही यावेळी शरद पवार गटावर केला.

शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले पण भाजपाच्या दुबेला मात्र मोकळीक पंडित नेहरु, इंदिरा गांधींबद्दल अश्लील शब्द वापरून बदनामी करणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबेला निलंबित करा

लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *