गुंडांना जात नसते, गुंडांना फक्त आपला स्वार्थ दिसत असतो. वाल्मिक कराडने सीआयडीसमोर येण्यापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केला होता. तो शरण येणार हे माहित असून देखील पोलिसांनी नाकाबंदी केली नाही. आज पूर्ण देशात आपल्या पोलिसांची नाचक्की झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मिक कराड आरोपी नाही असे कोणी म्हणत असेल तर परळीमध्ये आंधळेच्या हत्येमध्ये हा ३०७ चा आरोपी आहे. हे पोलिसांना माहीत नव्हते का? पोलिस म्हणजे बिळात लपलेल्या आरोपीला सुद्धा शोधून काढतात, पण इथे तर वाल्मिक कराडने पोलिसांनाच बिळात घातले आणि हा बिळावरून गेला. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. याच्यातले गांभीर्य कमी कसे होईल याच्याकडे राजकीय दृष्टीने बघायला पाहिजे असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी निधन प्रकरणावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ना राज्य सरकार ना महाराष्ट्र पोलीस कोणीच याबद्दल बोलत नाहीत. पोलीस माहिती देण्यास तयार नाही, ना सरकार माहिती द्यायला तयार आहे. पण उद्रेक झाला तर मग आहेच लाठीचार्ज. संविधान जपायचे, पण या संविधान जपण्यासाठी गेलेल्यांची हत्या झाल्यानंतर बघत बसायचे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. गरिबाची कोणीच बाजू घेण्यासाठी तयार नाही. हे सर्व प्रकरण दडपण्याच्या दिशेने जात आहे, असा आरोपही यावेळी केला.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी मुंबईत कॉलेजमध्ये असल्यापासून अनेक गोष्टी बघितल्या. दगडीचाळ असो किंवा इतर अनेक भागातील गुंड मी बघितले. मात्र मुंबई पोलिसांपुढे काय कुणाची हिंमत. त्या काळात दाऊदला कॉलर पकडून भेंडी बाजारमधून खेचून आणायचे. पोलीस हेच सर्वात मोठे दादा असतात, त्यांच्यापुढे कोणीही नाही. असं आमचा समज होता कालपर्यंत. मात्र आज परिस्थिती वेगळी असून वाल्मिकी कराड हा दाऊद, छोटा राजन, अमर नाईक यापेक्षा कोणी मोठा लागून गेला आहे. स्वतः चालत पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. जेव्हा की ते बापू आंधळे यांच्या हत्येच्या कटात ३०७ चा आरोपी आहे. पोलिसांना हे माहिती नव्हतं का? आरोपींना आपल्या महाराष्ट्रात अशी वागणूक देणार आहात का? असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार बीडला गेले असताना शिवलिंग मोराळे होता, ती गाडी अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये होती. याच गाडीतुन वाल्मिक कराड याला सोडलं. या प्रकरणामुळे पोलिसांची नाचक्की पूर्ण देशात झाली आहे. पोलिसांच्या भाषेत शरण आला यात काही अर्थ नाही. पकडून आणणे महत्वाचं असतं. पोलीस बिळातून शोधून आणत असतात. मात्र या प्रकरणात पोलीस बिळात होते अशी टीकाही यावेळी केली.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी संदर्भात आज ही कोणी बोलायला तयार नाही. हा मर्डर आहे हे कोणीही बोलायला तयार नाही. श्वासोश्वासाने तो मेलेला नाही. हे प्रकरण दडपण्याच्या दिशेने जात आहे. पत्रकार यांच्या मागे काही विशेष लोक फिरत आहेत. मी ही वंजारी आहे, मात्र शितावरून भाताची परिक्षा करु नका. राज्यात ४० हून अधिक आयएस आणि आयपीएस अधिकारी वंजारी समाजाचे असून चांगलं काम करत आहेत. आता धर्मावरून ते जातीवर आले, त्यानंतर ते पोटजातीवर जातील त्यानंतर भाषेवर जातील असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya