कमला मिल आगप्रकरणातील राजकारणाची धग शिवसेनेला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पालिकेतील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य

मुंबईः प्रतिनिधी

सुरक्षा उपायांची पुरेशी काळजी न घेता रेस्टॉंरंट चालविणाऱ्या मोजो ब्रिस्टोला आग लागून १४ जणांचा बळी जाण्याची दुर्घटना घडली. मात्र या दुर्घटनेवरून सर्वच राजकिय पक्षांनी राजकिय आग पेटवित त्याची धग शिवसेनेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कमला मिल कंपाऊडच्या आगप्रकरणात पालिका प्रशासनाचे धिंडवडे निघण्याऐवजी आगामी निवडणूकांचा मोसम लक्षात घेवून टीका-टीपण्णीच्या राजकारणाची धग समस्त मुंबईकरांना पाह्यला मिळाली.

कमला मिल कंपाऊड परिसरातील मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्याचे ट्वीट कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर लगोलग भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी या घटनेचे राजकिय भांडवल करत थेट लोकसभेतच हा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकसभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना सोमय्या यांच्या मतांचे खंडन करता करता चांगलीच भंबेरी उडाली. विशेष म्हणजे केंद्रासह राज्यात शिवसेना भाजपबरोबरील सत्तेत भागीदार आहे. तर मुंबई महापालिकेतील सत्तेत शिवसेनेबरोबर भाजप सहभागी आहे.

त्यानंतर मुंबईत शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या सत्ताकारणावर आगपाकड करीत टीका केली. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेवून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर नाराजी व्यक्त करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सदर प्रकरणाची आयुक्तांमार्फत चौकशी न करता पालिकेच्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी करत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही याच पध्दतीची प्रतिक्रिया व्यक्त करत सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कमला मिलमधील घटना ही महापालिकेच्या गलथान कारभाराचे पाप असल्याची टीका करत शिवसेनेच्या पालिकेतील सत्ता राबविण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदीत्य ठाकरे यांनी ही घटनेचे गांर्भीय वेळीच लक्षात घेवून मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी रात्रीच यासंदर्भात चर्चा करून शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनिल शिंदे यांना प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून मदत कार्यावर देखरेख करण्यास सांगितले. त्यामुळे राजकारण करू पाहणाऱ्या इतर राजकिय पक्षांना म्हणावी तशी राजकिय धग शिवसेनेपर्यंत पोचविता आली नाही.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *