महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. मात्र आज विधानसभेचे अधिवेशन सुरु होताच राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत मारकडवाडी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएम विरोधी घोषणा देत शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ४९ सदस्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही.
परंतु सत्ताधारी महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७३ निवडूण आलेल्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विरोधकांच्या सभात्यागानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे काम पहात होते. तसेच कोळंबकर यांनीच आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.
सकाळी ११ वाजता ‘वन्दे मातरम्’ आणि ‘महाराष्ट्र गीत’ झाल्यावर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला प्रारभ झाला. या वेळी महायुतीमधील आमदारांनी सभागृहात ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ या घोषणा दिल्या. सभागृहाला प्रारंभ झाल्यावर अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राज्यपालांनी त्यांना अस्थायी अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र वाचून दाखवले. विधानसभेच्या स्थायी अध्यक्षपदाची निवड ९ डिसेंबर या दिवशी होणार असल्याचा राज्यपालांचा संदेश कालिदास कोळंबकर यांनी वाचून दाखवला. यानंतर सभागृहात विधानसभा सदस्यत्वाच्या अर्थात आमदारकीच्या शपथ सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नावांची घोषणा केल्यानुसार लोकप्रतिनिधींनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येऊन आमदारकीची शपथ घेतली.
भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पहिली शपथ घेतली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ व्या क्रमांकाला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुक्रमे ६ आणि ७ व्या क्रमांकाला शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची शपथ झाल्यावर महायुतीमधील आमदारांनी सभागृहात ‘जय श्रीराम’ ‘जय भवानी, जय भवानी’ या घोषणा दिल्या.
Marathi e-Batmya