नाना पटोले यांची मागणी, …फडणवीसांनी अपमान केला; जाहीर माफी मागा लाडकी बहीण फक्त मतांसाठीच; ६४ हजार बेपत्ता भगिनी संदर्भात सरकारने खुलासा करावा

लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. व्होट जिहाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समतेच्या मुल्याचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचा इतिहासच माहित नाही. महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातीच्या मावळ्यांसह मुस्लीमही होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राने देशाला समतेचा संदेश दिला, त्याच राज्याचा गृहंमत्री लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशी वक्तव्ये करतो हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. लव्ह जिहादचे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली पाहिजे, ते स्वतः गृहमंत्री आहेत, कारवाई करण्याचे अधिकार त्याच्यांकडे आहेत मग कारवाई का करत नाहीत. त्यांच्याच पक्षाचा एक आमदार एका धर्माला शिव्या देत महाराष्ट्र तोडण्याचे पाप करत आहेत. महाभ्रष्ट महायुतीचे अडीच वर्षातील अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी फडणवीस आणि महायुतीकडून अशा प्रकारची धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत, पण राज्यातील सुज्ञ जनता याला बळी पडणार नसल्याचे यावेळी सांगितले.

मोदी-शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा मविआलाच

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राकडे एटीएम म्हणून पाहतात. हे त्यांना पैसे देणारे एटीएम मशीन वाचवण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल, असेही यावेळी सांगितले.

राज्यातील बेपत्ता ६४ हजार बहिणींचे काय झाले?

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा-शिंदे सरकार लाडकी बहिणी योजनेचा मोठा गवगवा करत आहे. त्यासाठी जाहिरबाजी करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एका वर्षात ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. यावर सरकारने खुलासा करावा. खरेच या सरकारला बहिणी लाडक्या आहेत का? का फक्त मतांसाठीच त्यांना लाडकी बहीण दिसत आहे. महिला बेपत्ता प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले असता राज्य सरकारने त्याचे उत्तर देणे टाळले तसेच बेपत्ता महिलांचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधानसभेत मांडला तेव्हा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी पळ काढल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकार लाडकी बहीण म्हणते आणि भंडाऱ्यामध्ये डब्बे वाटपाच्या कार्यक्रमात महिलांवर पोलीस लाठीचार्ज करतात. महिलांना मारण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे का? भाजपा शिंदे सरकार हे महिला विरोधी आहे, महिलांवर अत्याचार करणारे सरकार असल्याचा आरोपही यावेळी केला.

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी

राज्यातील महायुती सरकारवर शेवटी टीका करताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे सरकार धनदांडग्यांचे आहे. राज्यात सगळीकडे दुष्काळ आहे, अतिवृष्टीमुळे धान, कापूस, फळभाज्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार सर्वे करत नाही, सोयाबीनला ४ हजार भाव दिला जात आहे. मविआ सरकार असताना त्यावेळी विरोधी पक्षात असलेला भाजपा आंदोलन करून सोयाबीनला ६ हजार रुपयांचा भाव मागत होता. डिझेलचे भाव वाढले आहेत, खतांचा भाव वाढला, बी बियाणे महाग झाले पण सोयाबीनचा भाव मात्र वाढला नाही. शेतकरी संकटात आहे त्यातूनच तरुण शेतकऱ्याने सोयाबीन मंत्रालयासमोर टाकून सरकार विरोधातील राग व्यक्त केल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *