नाना पटोले यांचा सवाल, मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर डॉ. विश्वजीत कदम, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावार चिन्ह उपस्थित केले. नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदारकेंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही CCTV लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही दिला.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *