नाना पटोले यांची खंत, प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण

प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही. मात्र भाजपा कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपाला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा पक्षात जाण्यासाठी कोणते प्रलोभन मिळाले, हे तर वेळच सांगेल, परंतु ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्तेचा माज, सत्तेतून पैसा आणि पैशातून नेत्यांची खरेदी, हा नवा पायंडा भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा ट्रेंड अमित शाह यांच्यापासून सुरू झाला आहे. काँग्रेसची विचारधारा कधीही संपणारी नाही. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपवण्याचा कितीही प्रण घेतला असला, तरी शेवटी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजपा’च झाली आहे. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी संपूर्ण भाजपा खाली होईल. आज भाजपामध्येही पारंपरिक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, मोठा उद्रेक सुरू आहे.

प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होईल आणि विरोधी पक्षनेते पदावर याचा परिणाम होईल या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीला खरंतर विरोधी पक्षनेतेपद द्यायचेच नव्हते. त्यांना लोकशाही मान्य नाही. ज्यांना संविधान मान्य नाही, अशा भाजपकडून लोकशाहीची अपेक्षा तरी कशी करायची? हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच चालवण्यात आले. जनतेचे प्रश्न मांडणे आणि त्यावर उत्तर मिळवणे ही लोकशाहीची मूलभूत रचना आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात फक्त दोन खासदार असतानाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, हा इतिहास आहे आणि तो लपवता येणार नाही. लोकशाहीला दोन चाके असतात एक सत्तेचे आणि एक विरोधी पक्षाचे, ही परंपरा भाजपने मोडीत काढली आहे. संख्याबळ हा मुद्दा नाही; लोकशाहीची जाण काँग्रेसने जपली, भाजपाने नाही कारण भाजपाला संविधानच मान्य नाही.

काँग्रेस पक्ष चिंतन करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, याबाबत पक्षांतर्गत बैठक घेऊन सखोल चिंतन करण्यात येईल. ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.

जनतेच्या पैशाची लुट..

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने गोरक्षण करणाऱ्या संस्थांना २८० कोटी रुपयांचा निधी दिला. दहा ते पंधरा टक्के गोरक्षण संस्था चांगले काम करतात, त्याला आमचा विरोध नाही. मी हे विधानसभेतही स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र अनेक तथाकथित गोरक्षण संस्थांमध्ये पोलीस आणि गोरक्षक मिळून शेतकऱ्यांची लूट करत आहेत आणि शासनाची तिजोरीही रिकामी करत आहेत. गायींसाठी दररोज प्रत्येकी ५० रुपये सरकारकडून दिले जातात. भाजपाच्या तथाकथित गोरक्षण संस्थांवर जनतेचा पैसा उधळला जात असून राज्य भकास केले जात आहे. हे सर्व राज्य बघत आहे. फक्त सिडकोच नव्हे, तर सर्वच विभागांत जनतेचे पैसे लुटून महायुतीचे नेते आपल्या लोकांचे खिसे भरत आहेत असा आरोपही यावेळी केला.

महायुती सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग..

मंगेश कुडाळकर यांच्यावर सार्वजनिक निधीच्या गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारमध्ये भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे अनेक आमदार सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड करण्यात आली आहे. काम न करता पैसे घेतले गेले आहेत. त्यामुळे या सर्वांची सार्वजनिक चौकशी झाली पाहिजे. अधिकाऱ्यांवर नेमका कोणता दबाव टाकून आमदार निधीची ही अफरातफर करण्यात आली, हे या महायुतीच्या व्यवस्थेमुळेच झाले असल्याचे समोर येईल.

माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का?..

सुनील केदार यांना जो न्याय लावला, तोच न्याय माणिकराव कोकाटे यांच्यावर का लावला जात नाही, या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, सुनिल केदार यांना चुकीच्या प्रकरणात गोवून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. मात्र कोकाटे सभागृहात रमी खेळताना सापडले, त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुल ताब्यात घेतले हे सर्व रेकॉर्डवर असतानाही या सरकारने त्यांना कृषिमंत्री आणि क्रीडामंत्री केले, तसेच त्यांची आमदारकी कायम ठेवली. हे सरकार निव्वळ द्वेषाचे राजकारण करत आहे. आज सरकारमधील ७० टक्के मंत्री डागी वृत्तीचे आहेत, त्यामुळे कुणाला कोणते पद दिले जाते यावर चर्चा करण्याची आमची गरज नाही.

महायुती सरकारमध्ये ‘चोर-चोर मौसेरे भाई’..

धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांची भेट घेतली, तसेच सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत का, या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षातच नव्हे, तर भाजपमध्येही वेगवेगळे गट आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार फोडण्याची तयारीदेखील भाजप करत आहे. ही बाब सर्वश्रुत आहे, यात काहीही नवीन नाही. पार्थ पवार प्रकरणात प्रकरण दाबण्यासाठी अधिकाऱ्यांचा कसा वापर करण्यात आला, त्यांना कशाप्रकारे बाहेर काढण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणातही तेच कसे झाले, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे या सरकारमध्ये आज ‘चोर-चोर मोसेरे भाई’ असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे, असेही सांगितले.

 

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *