राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची टीका
रायगड- महाड : प्रतिनिधी
ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली…लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणावयाचे आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगतानाच जातीयविरोधी…कामगारविरोधी…सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे त्याला साथ दया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी महाडच्या जाहीर सभेत केले.
आरक्षण दयायचं होतं…दानत होती तर गरीबांना दयायचं होतं असा सवाल करतानाच इन्कमटॅक्स भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही. त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दोन जातींमध्ये दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात एकत्र लढूया
ओबीसी-मराठा या जातीमध्ये आरक्षणाच्या नावावर लढवलं जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून रहावे लागणार आहे.तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे ती एकत्रित लढवली पाहिजे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ केले.
आमदार छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल करत तर कधी त्यांच्या घोषणांवर टिप्पणी करत आणि खोटया आश्वासनांचा समाचार घेत जोरदार हल्ला केला. भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि योजनांचा पाऊस व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सरकारला आलेला सत्तेचा माज याविरोधात जोरदार प्रहार केला.
भाजपची वाट लागलेली आहे- जयंतराव पाटील
आत्ता लाट वगैरे काही राहिलेले नाही आत्ता यांची वाट लागलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकारच्या चार वर्षाच्या काळात काय विकास झाला…काय जनतेच्या हाताला लागले तर काही नाही.आमच्या काळात जी प्रगती करण्यात आली ती सगळी अधोगतीकडे नेला. एकीकडे भाजपाच्याविरोधात बोलायचे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची एका हॉटेलमध्ये भेट घ्यायची असा प्रकार सुरु आहे. उध्दव ठाकरे यांचे बाळासाहेबांचे रक्त असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले.
रायगडापासून इतिहास रचला जाणार – सुनिल तटकरे
या रायगडापासून इतिहास रचला जाणार असून वैभवाचे दिवस आणावयाचे असल्यास आणि धर्मनिरपेक्षतेचे राज्य आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभे रहा असे आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी केले. या ऐतिहासिक भूमीतून ही निर्धार यात्रा सुरु होत असून आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी परिवर्तन मागत असल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले.
भाजपला खडयासारखं बाजुला केल्याशिवाय गप्प बसायचं नाही
परिवर्तन हा निसर्ग नियम असून जे आपलं सरकार नाही. त्या सरकारला खडयासारखं बाजुला केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राजा शिवछत्रपतींच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होवून या रयतेच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा खासदार तटकरे यांच्या रुपाने द्यावा असा आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाडच्या जाहीर सभेत केले.
पहिली लढाई युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलुमाविरोधी केली आणि आमचा निर्धार हुकुमशहाच्या विरोधात असल्याची स्पष्टता करतानाच छत्रपतींच्या नावाने सत्तेत आलेल्या आणि त्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या भाजप सरकारवर हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला.
निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या शुभारंभाला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार छगन भुजबळ,राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Marathi e-Batmya