जयंत पाटील म्हणाले, भाजपाचेच आमदार फोन करून सांगतायत आम्ही खुष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा टोला

राज्यातील महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुळवड खेळताना केला. त्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाचेच आमदार आम्हाला फोन करून सांगतायत की फडणवीसांनी जेवढा विकास निधी दिला त्यापेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला म्हणून आम्ही खुष आहोत असे सांगत दानवेंच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

आमचे महाविकास आघाडीचे आमदार फुटणे शक्य नाही. जर एखादा फुटलाच तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नसल्याचा सांगत लोकच त्यास सळो की पळो करून सोडतील. इतकेच काय भाजपाचेच अनेक आमदार सध्या महाविकास आघाडीत येण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुळा – मुठा नदी स्वच्छता प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र आता त्यास काही पर्यावरण वाद्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा प्रकल्पाचे डिझाईन झाले, त्याचवेळी पर्यावरण प्रेमींनादेखील बोलवण्यात आले होते. त्यामुळे आता कुणाचाही त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही. मागील पाच सहा दिवसात आमच्या विभागाने अनेक लोकांशी बोलून त्यांच्या शंका समजून घेतल्या आहेत. त्यामुळे विरोध राहिल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत कोकणात जाणार असल्याचे सांगितल्या प्रकरणी विचारले असता पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणा चालवतात. त्यामुळे त्यांना आधीच माहिती असते कुणावर काय कारवाई होणार आहे हे, त्यामुळे पुढची माहिती असणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

राजु शेट्टी यांचे मोदींबाबत काही आक्षेप होते, म्हणुन ते बाहेर पडले होते. त्यामुळे आता परत ते जातील असे वाटतं नाही. मी त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत बोलेन असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे. तसे फोन करुन भाजपा आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही असा स्पष्ट इशारा देताना तिन्ही पक्ष एकत्र आले तर कदापी त्या आमदाराला शक्य नाही. भाजपाने आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावे असा टोलाही त्यांनी लागवला.

भाजपाला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सुरु आहे. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. एवढे सोप्पं नाही राजीनामा द्यायचं आणि बाहेर पडायचं. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोकं सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार? त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही. उलट भाजप आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *