राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत जिंकला. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत त्यांचा मोठा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यातच मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावत काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खोटक सवाल केला.
शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री नियुक्तीमध्ये एकवाक्यता नसल्याने अजून मुहुर्त निघाला नाही. मग सध्या निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत लोकांनी करायचं काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
राज्यात हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पिकांची हानी किंवा मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार समारंभात व्यस्त आहेत याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नैसर्गिक आपत्तीत पालकसचिवांना लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र यावरच मुख्यमंत्री तुम्ही थांबू नका याठिकाणी पालकमंत्री म्हणून लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे ,ते तुम्ही नेमले नाहीत याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
राज्यात पूरपरिस्थिती आणि निसर्गाचा प्रकोप असताना पालकमंत्र्यांची अनुपस्थिती यामुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पालकमंत्री नेमण्याची गरज आहे. मात्र शिंदे – फडणवीस यांच्यात एकवाक्यता नसल्याने गाडी अडकली आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Marathi e-Batmya