मराठी ई-बातम्या टीम
भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरला होता. याप्रकरणी पेडणेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यांनतर शेलार यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सांगत भाजपानेही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी राजकारणी व्यक्तींकडून वापरल्या जात असलेल्या भाषेबद्दल चिंता व्यक्त केली. विशेषतः महिला भगिनींबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आशिष शेलार यांना दिला.
राजकारणी व्यक्तींनी भाषा सांभाळून वापरली पाहिजे. बोलताना आक्षेपार्ह शब्द वापरायचे नसतात. कुणीही कुणाच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन बोलू नये, राजकारण्यांनी तारतम्य सांभाळून बोलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या विरोधात शस्त्र हाती घेणार नाही, असे स्पष्ट करताना पाटील यांनी २०२४ पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
तीनही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात गंभीर आहे. या अपघातामुळे आपल्या यंत्रणेतील गलथानपणा, त्यातील त्रुटी समोर आल्या आहेत. यावर संरक्षण विभाग विचार करेल, असेही त्यांनी प्रसारमाध्य प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले तसेच त्या दुर्घटनेबाबत आता शंका उपस्थित करणे योग्य राहणार नाही. सध्या त्याचा तपास सुरु असून त्यातून काही बाहेर आले तर त्यावर बोलणे योग्य होईल असेही ते म्हणाले.
शरद पवार व्हर्च्युअल शुभेच्छा स्वीकारणार
दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांना परवा, रविवारी ८१ वर्ष पूर्ण होत असून कोरोनामुळे ते व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन १२ डिसेंबर रोजी वरळीच्या नेहरु सेंटर येथे सकाळी ११ ते १ या वेळेत व्हर्च्युअल रॅली पार पडेल, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya