काल संध्याकाळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधिमंडळाच्या इतिहासतील काळी घटना घडवून आणली. त्यानंतर विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पडळकर-आव्हाड यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. तेव्हा विधान परिषदेतही या प्रश्नी विरोधकांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रतापावर चर्चा उपस्थित केली. तर विधानसभेतही याप्रश्नी विरोधकांकडून चर्चेची मागणी करण्यात आली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुपारी घटनेवर सभागृहात माहिती देणार भाष्य करणार असल्याचे सकाळच्या कामकाजावेळी जाहिर केले.
त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सभागृहात बोलताना म्हणाले की, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोबत आणलेला कार्यकर्ता देशमुख, टकले यासह अन्य कार्यकर्त्यांकडे प्रवेश पास नव्हता. तसेच हे सर्वजण आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत एक कार्यकर्ता सोबत आला. पण या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जे काही कृत्य केले ते विधिमंडळाची प्रतिष्ठेला धक्का लावेल असे केले आहे.
पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, त्यामुळे या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहिर करत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी ही त्यांच्यावरच राहणार आहे. त्यामुळे याप्रकरणाची आणखी चौकशी करून हे प्रकरण शिस्तभंग समितीकडे पाठविण्यात येणार आहे. दिल्लीतील संसदेत ही अशा काही प्रकरणाची अनुषंगाने विशेषाधिकार समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी समितीने काही संसद सदस्यांवर निलंबित करण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगत या दोन्ही सदस्यांच्या संदर्भात हे प्रकरण ही आपण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
राहुल नार्वेकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, यापुढे कोणत्याही अधिवेशनात अभ्यागतांना बंदी घालण्यात येत असून आमदारांसोबत एक स्विय सहाय्यक आणि शासकिय अधिकारी यांनाच विधान भवनात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच या दोन्ही सदस्यांनी भविष्यकाळात अशा घटना घडणार नाहीत. याची हमी द्यावी असे सांगत त्याच बरोबर सभागृहाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वृद्धींगत कशी होईल याची काळजी घ्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर घडणार नाही याबाबत सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी अपेक्षा सर्व सदस्यांकडून बाळगतो असे आवाहनही यावेळी केले.
दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खेद व्यक्त करायला लावला.
Marathi e-Batmya