वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या जबर मारहाणीत झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली. घाटी येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या मणक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पोलिसांनी सोमनाथला मारहाण केली, त्यांच्यावर मनुष्यवधाचा ३०२चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री सभागृहात जाहीरपणे खोटे बोलत असतील तर राज्याचे काय? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकर टीका करताना म्हणाले की, बीड, परभणी, लातूर येथील घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. पण जेवढ्या गांभीर्याने या घटना घ्यायला हव्यात तेवढ्या गांभीर्याने सरकार घेताना दिसत नसल्याची टीकाही केली.
ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, माऊली सोट यांना नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. फिर्याद दाखल करूनही दोन दिवस पोलिस त्याला बघायलाही आले नाहीत. त्याचे कपडे हॉस्पिटल स्टाफने कुठे ठेवले, कसे ठेवले याबाबत मी जायच्या आधी पोलिसांनी चौकशी केली नाही. माऊली सोट हत्याप्रकरणी डॉक्टरांची साक्ष घ्यायला पाहिजे होती. माऊलीच्या अंगावरील जखमांचे स्वरूप काय आहे. ती सुद्धा साक्ष घेतली गेली नाही.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या पद्धतीने माऊली सोट यांना घरी बोलावून मारण्यात आले आहे. हे एक प्रकारे ऑनर किलिंग आहे. स्व -जातीच्या वर्चस्वाच्या भावनेतून त्याला मारण्यात आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदार किंवा खासदारांनी त्या कुटुंबाला भेट दिली नाही. तेथील आमदार किंवा खासदारांनी पीडीत कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत करावी, अशी विनंतीही यावेळी इतर राजकीय पक्षांना केली.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, तसेच, एससी, एसटी अत्याचाराच्या संदर्भातील जो जीआर काढण्यात आला, तो जसाच्या तसा या ऑनर किलिंगच्या घटनेला लागू करावा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच साह्य ऑनर किलिंग प्रकरणात दिले गेले पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गृहमंत्रालय किंवा पोलीस प्रशासन यांच्यात हळूहळू द्वेषाची भावना वाढत आहे असे मला दिसत आहे. हे सगळ्यात वाईट आहे. प्रशासनात जातीचे विष पसरायला लागले आहे. ही चांगली गोष्ट नसल्याची खंत व्यक्त केली.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) January 22, 2025
Marathi e-Batmya