प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, राज्यात ७५ लाख मते कशी वाढली? वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर

ईव्हीएम EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली याचे उत्तर मिळालेले नाही असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
निवडणूकीच्या आरओनी पत्राला उत्तर दिल्यानंतर त्या संदर्भातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

ॲड प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आम्ही लिहिलेल्या पत्रातील मुद्दे महत्वाचे आहेत. त्यातील पहिला मुद्दा २० तारखेला मतदान किती झाले याची आकडेवारी आणि २३ तारखेला सर्व मतदान जेव्हा मोजण्यात आले त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी अशी मागणी आम्ही केली. २० तारखेला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जी माहिती टाकण्यात आली आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहानंतर ७५ लाख मतदान झाले आहे असे सांगण्यात आले आहे. याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला असल्याचे यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सायंकाळी सहानंतर किती मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी. संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण पोलिंग बूथ वाईज स्लीप वाटली असेल, तर त्या किती वाटल्या याची माहिती द्या, कोणत्या अधिकारात आपण या स्लीप वाटल्या आहेत याबाबत माहिती द्या अशी मागणी आम्ही पत्र पाठवून निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, नांदेड दक्षिण, औरंगाबाद पश्चिम आणि परंडा येथील आरओनी आमच्या पत्राला सरकारी पद्धतीची उत्तरे दिली आहेत. त्यातील समान भाग म्हणजे सदर माहिती दैनंदिन लिफाफामध्ये सील बंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही. असे आर. ओ यांनी उत्तरे दिल्याचे स्पष्ट केले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तीनही आरओ यांचे उत्तर समान आहे. त्यामुळे प्रश्न असा होतो की, ७५ लाख मते खरेच झाली होती का ? कायदा असे म्हणतो की, एकदा सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटे झाले की, निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागते, दरवाजे बंद करावे लागतात, जे आत मध्ये आहेत त्यांना टोकन दिले जाते आणि जेवढ्या मतदारांना टोकन असते त्यालाच मतदान करण्याचा अधिकार असतो असेही यावेळी सांगितले.

…. तर निवडणुकीला काही अर्थ उरणार नाही

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला मिळालेले उत्तर आम्ही इतर पक्षांना देखील पाठवणार आहोत. आपल्यातील जे राजकीय मतभेद आहेत ते आपण बाजूला ठेवले पाहिजेत. जर आपण ते बाजूला ठेवले नाही आणि अशाच रीतीने मतदान होणार असेल त्याला काहीही अर्थ रहात नाही असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

दुबईत अडकलेल्यांना मराठी जनांना विशेष विमानाने मुंबईत परत आणणार दुबईत अडकलेल्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *