प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, ओबीसींवरील अत्याचारावेळी ओबीसी नेते कुठे असतात? जालना प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करा

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी नेते मिरवताना दिसतात. पण प्रत्यक्षात ओबीसींवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ येते तेव्हा हेच ओबीसी नेते कुठे गायब होतात? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका धनगर समाजाच्या कैलास बोऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. या घटनेतील दोषींवर तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, छगन भुजबळ, नवनाथ पडळकर, लक्ष्मण हाके, पंकजा मुंडे हे स्वतःला ओबीसींचे नेतृत्व करणारे म्हणवतात. मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होत असताना हे कुठे असतात? जालना येथील या गंभीर घटनेकडे या नेत्यांनी अजूनही गांभीर्याने पाहिलेले नाही, ही बाब दुर्दैवी आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, “वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली असून, पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. मात्र, केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली असून, लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या संदर्भात जालना जिल्ह्यातील ओबीसी संघटनांशी चर्चा झाली असून, त्यांनी ६ तारखेला मोर्चा आयोजित केला आहे. शासनाने तातडीने दोषींना अटक करावी, तसेच गावकऱ्यांनी ही अमानुष घटना उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे, तर त्या गावावर सामूहिक दंड बसवावा, अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तसेच तुम्ही जे पेरता, तेच उगवते. धार्मिक द्वेष पसरवल्याने राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत आहे, अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

 

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *