एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना स्वच्छ, सुंदर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यातील निवडक बसस्थानकांवर जेजुरी बसस्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक दुमजली प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, जेजुरी बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या दुमजली प्रसाधनगृहांच्या धर्तीवर राज्यातील अन्य बसस्थानकांवरही प्रवाशांच्या गरजेनुसार प्रसाधनगृहांची उभारणी केली जाणार आहे. या प्रसाधनगृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतालयांची व्यवस्था असेल. तसेच रात्रीच्या वेळी बसस्थानकावर मुक्कामी येणाऱ्या प्रवाशांना सकाळी पुढील प्रवासासाठी निघण्यापूर्वी अंघोळ करता यावी, यासाठी स्वतंत्र स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, विशेष म्हणजे, या प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थित राखली जावी, यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोयही त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे अधिक सुलभ होणार आहे.
शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी प्रवास केवळ सुरक्षित आणि आरामदायीच नव्हे, तर स्वच्छ व आरोग्यदायीही असावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या सुविधांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, रात्री प्रवास करणारे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहराही बदलणार आहे.
Marathi e-Batmya