प्रविण दरेकर यांची टीका, मविआने घोडे नाचवले तरी… नौटंकीला थारा नाही भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची महाविकास आघाडीवर टीका करत तानाजी सावंत यांना दिला सबूरीचा सल्ला

छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून जे काही किळसवाणे राजकारण मविआतर्फे सुरू आहे ते थांबले पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपतींच्या पुतळ्याचे राजकारण करणे आवडत नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती हे आमचे आराध्य दैवत आहे त्यासाठी एकदा काय शंभरदा नतमस्तक व्हायला लागले तरी होऊ, अशी कुठलाही अहंभाव न ठेवता भुमिका घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, जाहीर माफी मागतो, अशी भुमिका घेतल्यानंतर मविआ जे राजकारण करतेय त्याला चांगलीच चपराक बसलीय. मविआने आता कितीही वराती मागून घोडे नाचवले तरी जनता त्यांच्या नौटंकीपणाला थारा देणार नाही, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी राज्यातील विविध घडामोडिंवर भाष्य केले. प्रविण दरेकर बोलताना म्हणाले की, विरोधकांचे टार्गेटच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सर्वस्वी त्यांना व्हीलन बनविण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. बदलापूरची घटना असो किंवा छत्रपतींच्या पुतळ्या मागील असो जे-जे आरोपी, दोषी आहेत त्यांच्या मुसक्या आवळून काही दिवस गेले तरी लवकरात लवकर त्यांना आणले जाईल. सरकार त्यांना पाठीशी घालणार नाही.

पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, तसेच फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या वर्षांचा लेखाजोखा काढा. तेव्हा राज्याला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न झालाय की राज्य अधोगतीकडे गेलेय याचा हिशोब मांडण्याची गरज असून एका व्यासपीठावर येऊन चर्चा करूया असे आव्हान दरेकर यांनी यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना दिले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र रसातळाला घालवला, विकासाचे कुठलेही काम नाही. त्यावर पृथ्वीराज चव्हाण भाष्य करत नाही. मविआ पूर्णपणे राजकीय भूमिकेने पछाडली असल्याचा आरोपही यावेळी केला.

महायुतीत होणाऱ्या वक्तव्यावर प्रविण दरेकर म्हणाले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महायुतीत अजिबात तडा जाणार नाही. जे पक्षाच्या वतीने अधिकृत बोलतात त्यांनी भान ठेवले पाहिजे. जेव्हा पक्ष महायुतीची भुमिका घेतो तेव्हा महायुतीत विसंवाद होईल अशी भुमिका कुणी घेता कामा नये याची काळजी घेण्याची गरज आहे. महायुतीत वितुष्ट येईल अशा प्रकारची वक्तव्य कुणी करू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच महायुतीत योग्य समन्वय आहे. काही वाचाळवीर असतात, काही लोकं प्रसिद्धीसाठी स्टंट करतात. अशा वेगवेगळ्या कारणांनी वक्तव्य येतात. परंतु पक्ष त्यांना योग्य ती समज वारंवार देत असतो. ज्यावेळी तीन पक्षाची महाविकास आघाडी किंवा महायुती होते. स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांत चलबिचलता होते. याचा अर्थ महायुतीत काही होईल असे माणण्याचे कारण नाही.

प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, जिथे महायुती असते तिथे तीन-तीन पक्ष असतात. महाविकास आघाडी असते तिथे तीन पक्ष असतात. ज्यावेळी एकापेक्षा अनेक पक्ष, त्या पक्षाचे नेते दावेदार असतात आणि जर एका पक्षाला जागा गेली तर दोन नेते असतात त्यांच्या स्वाभाविकपणे राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण होईल.काही पक्षाशी एकनिष्ठ राहून वाटचाल करतात. काहीची थांबायची तयारी नसते त्यांना निवडणुका लढवणे हाच अंतिम गोल असतो. हे महाविकास आघाडीतही आहे आणि महायुतीतही असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांचे मोठे नेते म्हणून भाजपात स्थान आहे. तेथील स्थानिक आमदार भरणे आहे. राष्ट्रवादी ती जागा मागतेय त्यातून हा वाद समोर आला आहे. हर्षवर्धन पाटील यांना समजविण्याचे किंबहुना भुमिका काय आहे याबाबत देवेंद्र फडणवीस संवाद साधतील. हर्षवर्धन पाटील जाऊ नये अशी भाजपाची मनापासून इच्छा आहे. एक क्षमतेचा ताकदवान आणि परिपक्व असा नेता आहे तो जाऊ नये या भूमिकेतून आम्ही काम करतोय.

प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. कुठल्याही वक्तव्याने महायुतीच्या यशस्वी वाटचालीला अडथळा निर्माण होईल असे जबाबदार नेत्यांनी, मंत्र्यांनी भुमिका घेता कामा नये. तानाजी सावंत यांची बिनधास्त, बेधडक आणि कशाचा विचार न करता अनेकदा त्यांची वक्तव्य आलेली आहेत. त्यामागे कुणाची भावना दुखवायची नसते. ते आरोग्य विभागातही प्रचंड काम करताहेत. परंतु अशा वक्तव्यांमुळे महायुतीबाबत जनतेच्या मनात विपरीत परिणाम होऊ शकतो याची काळजी तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांनी घेण्याची गरज असल्याचेही मतही यावेळी व्यक्त केले.

शेवटी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, ज्यांच्या नसानसांत केवळ राजकीय अभिनिवेष भरलाय, ज्यांच्या दृष्टीला राजकीय कावीळ झालीय त्यांना सगळं जगच राजकीय दिसणार. पंतप्रधान मोदींची भूमिकाही राजकीय दिसणार. कारण विरोधक राजकीय कावीळने पूर्णपणे ग्रस्त झाले आहेत.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *