पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार वीज ग्राहकांसाठी उपयुक्त अशा योजनांवर भर द्या

घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात २५,०८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसविल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला.

सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.

योजनेची अंमलबजावणी महावितरणच्या माध्यमातून होत असून शंभर मेगावॅटचा टप्पा ओलांडल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे अभिनंदन केले. ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या २५,०८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये १६० कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरीत करण्याचे काम सुरु आहे.

आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३,५१,९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे. यापैकी योजनेत २,३३,४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प रु.७५,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे.

ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते.

निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. ३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. १८,००० अनुदान मिळते. ३ किलावेंट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. ७८,००० पर्यंत मयांदित आहे

गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी रु.९०,००,००० पर्यंत रु. १८,००० प्रति कि.वॅ प्रमाणे अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी एकूण कमाल मर्यादा ५०० किलो वॅट पर्यंत लागू आहे.

महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.

वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *