Breaking News

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश, गौण खनिजे लोकांना सहज उपलब्ध होण्यावर भर द्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय होणार

कोकण व पुणे विभागाची गौण खनिज आढावा बैठक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महसूल मंत्री यांनी लोकांना सहज आणि जलद गतीने गौण खनिज उपलब्ध झाले पाहिजेत यासाठी उपाय योजना निर्माण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याच बरोबर नियमबाह्य सुरू असलेल्या सर्व दगडखाणींचा आढावा घेऊन त्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
सदर बैठकीसाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव धनंजय निकम, तसेच कोकण व पुणे विभागातील अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म उपस्थित होते.

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गौण खजिजाबाबत नागरिकांच्या असलेल्या अडचणींची माहिती घेत लोकांना वाळू, दगड, मुरुम, माती अशी गौण खनिजे सहजरित्या उपलब्ध कशी होतील याकडे शासनाने लक्ष देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे अनेक गौण खनिज व्यवसायिकांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी असलेल्या अटी सुलभ करून शासनाचा महसूल कशा पद्धतीने वाढला जाईल अशा उपाययोजना निर्माण करा असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

पुढे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सर्व खदानी ड्रोनच्या माध्यमातून तपासणी करून नियमबाह्य सुरू असलेल्या खदानींवर कडक कारवाई करा असे आदेश देत स्टोन क्रशर, इमारत बेसमेंट आणि गौण खनिज वाहतूक परवाने याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेऊन लोकांना सहज आणि जलद गतीने गौण खनिजे उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी महसूल मंत्र्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत