काँग्रेसकडून १९ किलोमीटर पदयात्रा काढून महामानवाला अभिवादन राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेतः बाळासाहेब थोरात

राहुल गांधी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत आहेत. बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठीच राहुलजींनी साडे तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आहे व देशातील जनतेचा या यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अमरावतीतील इर्विन चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी जेथे जतन करण्यात आलेल्या आहेत त्या नया अकोला गावापर्यंत महापदयात्रा काढून काँग्रेस नेत्यांनी महामांनव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. याप्रसंगी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखेडे, माजी मंत्री सुनिल देशमुख, माजी आ. विरेंद्र जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती शहरातील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरु झालेली पदयात्रा शेगाव नाका, कठोरा नाका, हर्षराज कॉलनी, नवसारी, तिवसा, वलगाव मार्गे नया अकोल्यात पोहोचेली व अभिवादन सभेने यात्रेची सांगता झाली.

या अभिवादन सभेत बोलताना थोरात म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण सलग १९ किलोमीटर पदयात्रा करत आले हे अभूतपूर्व चित्र आहे. संत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे कि, या भारतात बंधू भाव नित्य वसू दे , गाडगे महाराजांनीही गरिबांमध्ये देव शोधला. अशा महान संतांच्या या पवित्र भूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. यामुळे ही भूमी पावनभूमी झाली असून या भूमीला श्रद्धाभूमी म्हणावे लागेल.

भारतरत्न डॉ.आंबेडकर हे कुणा एका समाजाचे नसून ते संपुर्ण मानवतेचे आहेत. जिथे कुठे अन्याय होत होता तिथे त्याविरोधात ते भक्कमपणे उभे राहिले. देशात लोकशाही सुरु आहे त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहे एक महात्मा गांधी यांची सत्याग्रहाची चळवळ आणि दुसरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना. घटनेने सर्वसामान्यांना मतदानाचा, बोलण्याचा, समतेचा दिला, शिक्षणाचा अधिकार दिला. संचार करण्याचे स्वातंत्र्य, समानता दिली. ही तत्वे आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. पण दुर्देवाने देशाच्या सत्तेवर बसलेली लोकचं या घटनेला पायदळी तुडवून देश चालवू पहात आहेत.

संविधान लोकशाहीच्या रक्षणासाठी व जनतेला भेडसावणा-या महागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या समस्या या ज्वलंत प्रश्नांवर राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ३५६० किलोमीटरची भारत जोडो पद यात्रा काढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला रस्त्यावर राहुल गांधी पुढे चालत आहे. देशातील सद्यस्थिती चांगली नाही. राजकारणाची पातळी घसरली आहे, शिवराळ भाषा वापरली जात आहे. मतांसाठी महापुरुषांचा वापर सुरु आहे. असंविधानिक मार्गाने आलेले महाराष्ट्रातील विद्यमान सरकार लोकशाहीला अभिप्रेत नाही. राज्यपाल पदावर बसलेला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य करत आहे. शिवरायांवर चुकीचे बोलत असून त्यांना बदनाम करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरु आहे.

महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम नसून मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत. सीमा प्रश्ना संदर्भात आपलेच लोक बाहेर राज्यात जाऊ द्या असे म्हणू लागले आहेत. लोकांचा सरकारवर विश्‍वास नाही. अशी वाईट परिस्थिती यापूर्वी नव्हती. अतिवृष्टी, पुरामुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत याबाबत कुणीही बोलत नाही. मिटींग घेतल्या जात नाहीत. हे योग्य नाही. जो विचार महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला तो जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांनी असून तो विचार जपूया व पुढे घेवून जावूयात हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली खरी श्रद्धांजली असणार आहे असे थोरात म्हणाले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *