Breaking News

जोडे मारो आंदोलनः शरद पवार यांचा आरोप, मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा… शिवप्रेमी जनतेचा अपमान केला

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी घेतली. “मालवणजवळ शिवछत्रपतींचा पुतळा वाऱ्याने उध्वस्त झाला” असं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आज आपण ‘गेट वे ऑफ इंडिया’ला उभे आहोत, याही ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा आहे. हे शिल्पही सागरी किनाऱ्याजवळच आहे. तरीही गेली ५० वर्ष हे शिवछत्रपतींचं शिल्प लोकांना प्रेरणा देत असल्याचं सांगितले.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, CWC सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक पुतळे आहेत पण मालवणच्या भागात उभा केलेला पुतळा हा एक भ्रष्टाचाराचा नमुना होता. त्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाला. असा जनमानसांमध्ये समज आहे आणि हा शिवछत्रपतींचा अपमान आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशातल्या शिवप्रेमी जनतेचा अपमान आहे. हा अपमान ज्यांनी केला त्यांचा सक्त निषेध करण्यासाठी आजची ही मोहीम असल्याची टीकाही यावेळी महायुती सरकारवर केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षापासून आहे, राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे, त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत असेही यावेळी सांगितले.

Check Also

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *