Breaking News

शरद पवार यांची खोचक टीका, पंधराशे रु. पेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं संरक्षण देणं गरजेचं ज्यांना सत्तेचा माज...त्यांना खड्यासारखं बाजूला काढायचं

हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय… इथे गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना २०-२० वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता ती लोकांवर खटले भर, त्यांना तुरुंगात टाक, त्यांना त्रास दे, सत्तेचा गैरवापर कर म्हणून वापरली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी करत सत्तेचा ज्यांच्या डोक्यात सत्तेचा उन्माद चढलेला आहे त्यांना खड्यासारखं बाहेर काढायचं. त्यांना त्यांची जागा दाखवायची असा सूचक इशाराही सत्ताधाऱ्यांना दिला.

शिंदेखेड राज्या येथे आयोजित कार्यक्रमात शरद पवार हे आले असता त्यांनी राज्य सरकारवर टीका करत माझी लाडकी बहिण योजनेवर टीका करत १५०० रूपयांपेक्षा बहिणीची अब्रु आणि रक्षण गरजेचं असल्याची भूमिका मांडली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, तुम्हा लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी पडेल ते कष्ट करतो त्यांच्यावर खोटे खटले भरले. जे तुमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्या हेमंत देशमुखांना अटक केली जाते, तुरुंगात टाकला जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचा एक चमत्कारिक उदाहरण या तालुकामध्ये बघायला मिळतं. सत्ता लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा माज डोक्यात शिरतो आणि एकदा सत्तेचा माज माणसाला आला की तो अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो. आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीत जो अधिकार दिला तो लोकांची सेवा करण्याचा. एका बाजूने लोकांची सेवा करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्माद आहे. ज्यांना हा उन्माद चढलेला आहे त्यांना खड्यासारखं बाहेर काढायचं. त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. २०-२० वर्षे आमदारकी पण काही विकास नाही. रस्ते धड नाहीत. शेतीची अवस्था ठीक नाही. मग काय केलं काय ह्या २० वीस वर्षांमध्ये? काही कारखाने काढले? साखर कारखाने काढले? जी कारखानदारी होती तीही बंद केली. नव्या पिढीला एमआयडीसी मधून रोजगार दिला? काय केलं मग? असा सवालही यावेळी केला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज काही लोक सांगतात आम्ही काम करो ना करू आम्ही आमच्या बहिणींना पंधराशे रुपये दिले. बहिणींचा सन्मान हा या देशांमध्ये प्रत्येक आनंद वाटणारा सन्मान आहे. पण आवश्यकता काय? तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचा. महाराष्ट्रामध्ये रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर कुठल्यातरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींवर अत्याचार झाला ही बातमी वाचायला मिळते. पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रु. पेक्षा आमच्या बहिणीची अब्रू वाचवणं त्यांना संरक्षण देणं, तिचं रक्षण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण त्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक सुरु असल्याची टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर यावेळी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत