पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील ५५ टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, यात दोन भाग आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पाचवीपासून हिंदी शिकणे त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताचे आहे. आज देशामध्ये जवळपास ५५ टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी बोलली जात नाही. मराठी, कानडी, मल्याळम, बंगाली, ठराविक लोकसंख्या याचा आधार घेते म्हणून हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही. साधारणत: महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे, त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा लादणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे यांनी स्पष्ट केले. हिंदी भाषा सक्ती विरोधात काढण्यात येणाऱ्या ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचे पक्षाकडून जाहिर करण्यात आले आहे.
पुण्याच्या नामांतरावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पुण्याच्या नामांतराच्या वादाला विनाकारण उभारी देऊ नका. बाजीराव पेशव्यांचं नाव का दिलं पाहिजे, हे मला कळत नाही. शौर्य हेच जर परिमाण असेल तर अनेकांची नावे देता येतील. छत्रपती संभाजी महाराजांकडे शौर्य आणि त्याग कमी होतं का? त्यामुळे विनाकारण समाजामध्ये अंतर वाढवू नका.असे आवाहनही केले.
Marathi e-Batmya