माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच किंवा सुपारी त्यावेळचे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या या आरोपाला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिल्यानंतर याबाबत फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी कोणताही आरोप वळसे-पाटील साहेबांवर केला नाही. त्यांनी काही केले नाही, मात्र वरून आदेश आले होते असे सूचक विधान केले.

काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आज तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील काही निवडक मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी वरील वक्तव्य केले.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपण केलेल्या आरोपावरून घुमजाव करत पुन्हा याप्रकरणातील गुढ वाढविण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही शिंदे गटाचे मंत्री आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही असाच उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. मात्र वास्तव वेगळेच निघाले. त्यामुळे शंभूराज देसाई यांनी या विषयावर पुन्हा कधीच विषय काढला नाही.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, वळसे-पाटील यांनी काही केले नाही. तसेच मी त्यांच्यावर कोणताही आरोप केला नाही. मात्र माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आणि तुरूंगात टाकण्याचे आदेश वरून आले होते अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत एकप्रकारे घुमजाव करण्याचा प्रयत्न केला.

तसेच या आदेशाची माहिती आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही होती असे सांगत या आरोपात मुख्यमंत्री शिंदे यांनाच साक्षिदार बनविण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचा दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या नियुक्ती मागे ना शिवसेना होती ना राष्ट्रवादी काँग्रेस होती. त्यांना मुंबई पोलिस आयुक्त पदाचा पदभार हा त्यांच्या ज्येष्ठतेनुसार मिळाला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्याप्रमाणे वरून आदेश आले होते असे जरी गृहीत धरले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दोनच महाविकास आघाडीचे नेते होते. मात्र शरद पवार यांची राजकिय आणि प्रशासकीय काम करण्याची पध्दत पाहता ते असल्या गोष्टी करण्यासंदर्भात कधी आदेश देतील असे दिसून येत नाही. तर उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा पहिल्यांदाच प्रशासनाशी संबध आला होता. मात्र त्यावेळच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची मते जाणून घेता मुख्यमंत्री ठाकरेंकडून तसे आदेश जाणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया मंत्रालयातील बड्या प्रशासकिय अधिकाऱ्यांक़डून व्यक्त करण्यात येत आहे.

शंभूराज देसाई यांच्या प्रमाणे देवेंद्र फडणवीस हे ही फक्त सणसणीखेज वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *