शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे एकप्रकारची खदखद भाजपामध्ये निर्माण झाली. या खदखदीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच वाट मोकळी करून देत म्हणाले, मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली.
त्यामुळे तातडीने भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य असलेले भाषणच हटविले. तर त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुढे येत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा भावार्थ हा भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या भावनेचा होता.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी व कार्यसमितीच्या पनवेल येथे झालेल्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सह सरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते.
भाजपा व शिवसेना युतीला २०१९ मधील निवडणुकीत बहुमत मिळूनही शिवसेनेने विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. कोरोना काळात जनतेचे खूप हाल झाले. सरकारविरोधात कोणी टिप्पणी केल्यास तुरुंगात डांबले गेले. राज्याची विकास गती मंदावली. गेल्या अडीच वर्षांतील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा एक नेता देण्याची गरज होती. त्यामुळे मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने दिला आणि तो फडणवीस यांनी मान्य केल्याचेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार फडणवीस यांच्या त्यागाबद्दल सर्वांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यावर पक्षनिर्णयाविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावत म्हणाले, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोणाचाही नामोल्लेख न करता पाटील म्हणाले, फडणवीस यांनी त्याग केला. पण आपलीही काही जबाबदारी आहे. नगरपालिका किंवा कुठेही उमेदवारी मिळाली नाही की कार्यालय फोडायचे, रूसून बसायचे, हे योग्य नाही असा टोलाही त्यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला.
सरकार आज आले, पण भाजपा पक्ष म्हणून मजबूत होता, आहे व राहील. पक्षाच्या नेत्यांवर श्रध्दा ठेवा. काहीजण ओक्साबोक्शी रडले. मनाचा मोठेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. मनाविरुध्द घडले तरी आपले दुःख विसरून कामाला लागा. संघटना मजबूत करा. नेत्यांनी आदेश देण्याची गरज नाही. त्यांची इच्छा पाहून निर्णय स्वीकारावा. नाहीतर मनाविरुध्द घडले की आपल्या समर्थकांना किंवा गटाला घेऊन जिल्हा परिषदेतून बाहेर पडायचे, असले प्रकार करू नयेत अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.
Marathi e-Batmya