नवी दिल्लीः प्रतिनिधी
केंद्रात नव्याने स्थानापन्न झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे खाते वाटप आज दुपारी जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग विभाग देण्यात आला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद बहाल करत रामदास आठवले यांना पुन्हा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने दुसऱ्यांना संधी मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या खाते वाटपात बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु भाजपचे संजय धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय, कम्युनिकेशन आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश करत त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न व पुरवठा मंत्रालयाचे राज्यमंत्री पद सोपविण्यात आले.
याशिवाय रामदास आठवले यांच्याकडे गतवेळचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे.
तसेच नितीन गडकरी यांच्याकडेही गतवेळचे रस्ते- महामार्ग आणि लघु उद्योग विभागाचा कारभार सोपविण्यात आला आहे.
याशिवाय केंद्रीय गृहमंत्री पदाचा कारभार यंदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण विभाग तर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे.
वादग्रस्त स्मृती इराणी यांच्याकडे केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
Marathi e-Batmya