उध्दव ठाकरे म्हणाले भाजपाचा प्रस्ताव आलाच नाही शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून ६ दिवस झाले तरी महायुतीतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला घोळ काही केल्या संपेना. त्यातच आता भाजपाने १३ मंत्रीपदासह उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवसेनेला पाठविल्याची माहिती भाजपा सूत्रांनी दिली. परंतु अशा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव शिवसेनेकडे आला नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने पुढील चार-पाच दिवस सत्तास्थापनेचा घोळ सुरुच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
तसेच मुख्यमंत्री पदाचे समान कालावधीसाठी वाटप करण्याच्या मागणीवर शिवसेना आग्रही आहे. मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख मागणीशिवाय शिवसेनेकडून इतर कोणत्याच खात्यांच्या बाबत आग्रही नसल्याचेही शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान भाजपा-शिवसेनेची युती जाहीर करताना सत्तेत आल्यानंतर पदांचे समसमान वाटप करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याच पध्दतीने विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतरही होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र विधानसभेत शिवसेनेला ५६ तर भाजपाला १०५ जागा मिळाल्या. त्यामुळे सेनेपेक्षा भाजपला दुप्पट जागा मिळालेल्या असल्याने सत्तेतील पदांचे समसमान वाटप करायचे असा यक्षप्रश्न भाजपासमोर निर्माण झाला आहे. तर शिवसेनेनेकडून या समसमान वाटपाच्या मुद्यावर आग्रही भूमिका घेतली आहे.
या आग्रही भूमिकेमुळे राज्यातील सत्ता स्थापनेचे घोंगडे भिजत राहीले आहे. तसेच राज्यातील सत्तेचे समसमान वाटप केल्यास मागील ५ वर्षात भाजपाने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मांड ठोकली आहे, त्यास तडे जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात त्याची फार मोठी किंमत भाजपाला मोजावी लागणार असल्याच्या भीतीने शिवसेनेच्या बार्गिंनींग पॉवर भीक न घालण्याचे धोरण भाजपाकडून तुर्तास ठरविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेला भाजपाकडून प्रतिसाद देण्यात येत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी विविध प्रस्ताव सेनेला दिल्याचे भाजपाने दाखवून दिले. मात्र प्रत्यक्षात भाजपाकडून कोणताही प्रस्ताव शिवसेनेला मिळाला नसल्याचे आणि या दोन्ही पक्षात कोणतीही चर्चा होत नसल्याचे स्वतः उध्दव ठाकरे यांनीच स्पष्ट केल्याने सत्तेचा सोपान भाजपासाठी पूर्वीइतका सुकर राहीला नसल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा, वाटचाल दिवाळखोरीकडे तिसरी व चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग अदानी अंबानीच्या फायद्यासाठी, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात स्थान नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *