मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील बहुचर्चित शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेची निश्चिती झाली असून या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे राहणार आहे. तसेच उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सहमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.
वरळी येथील नेहरू सेंटर येथील एका पंचतारांकित हॉटेलात आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संजय राऊत, आदीत्य ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, सी.वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात यांची एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री पदावर उध्दव ठाकरे यांच्या नावावर सर्वपक्षियांची सहमती झाली आहे. तसेच इतरही मुद्यांवर चर्चा झाली. यातील काही मुद्यांवर चर्चा होण्याची गरज असून ती उद्या अंतिम होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याची माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर उध्दव ठाकरे हे बाहेर पडल्यानंतर त्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, अनेक मुद्यांवर चर्चा झालेली आहे. आणि काही चर्चा होणे बाकी आहे. ती लवकर पूर्ण झाल्यानंतर माध्यमांशी बोलू.
Marathi e-Batmya