मुंबईः प्रतिनिधी
कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या आणि आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गुजरातमध्ये गेले. त्यांच्या या भूमिकेवर त्यांनी टीका केली.
शिवसेनेने भाजपासमोर अक्षरशः लोटांगण घातले आहे हे त्यांच्या जाण्याने समोर आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएचे घटकपक्ष बोलावण्यात आले. यावरुन अमित शहा अडचणीत आहेत हे दिसून येत आहे. कालपर्यंत गांधीनगरमध्ये कुणीही प्रचाराला यायचं नाही ही भाजपची भूमिका राहिली होती. परंतु आज सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आले यावरुन अमित शहा हे अडचणीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी ६ दिवस लागतील हे निवडणूक आयोगाचे म्हणणे योग्य नाही
यापुर्वी बॅलेट पेपरवर निवडणुकीचा निकाल १२ ते १४ तासात येत होता आणि आता सहा दिवस लागतील हे निवडणूक आयोगाचे म्हणणे योग्य नाही असे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस आणि अन्य २१ विरोधी पक्षांनी ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात बाजु मांडण्यात आली.
निवडणुक आयोगाने ५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी ६ दिवस लागतील असे सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. निवडणूक आयोगाचा हा दावा आम्हाला मान्य नसल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. याबाबत सुप्रीम कोर्ट काय तो निर्णय घेणार आहे. परंतु निवडणूक आयोग जी भूमिका मांडत आहे ती योग्य नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Marathi e-Batmya