मुंबईत उतरताच संजय राऊत म्हणाले, माझी तयारी आहे… मुंबई विमानतळावर उतरताच राऊतांचा सवाल

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात १०३४ कोटी रूपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत दिल्लीत होते. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले. खुद्द शरद पवारांनी देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर संजय राऊत हे मुंबईत विमानतळावर येताच भाजपाला आव्हान दिले. विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपावर टीका केली.
तुम्ही आमचं काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे २५ वर्ष तुमचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे. राजकीय विरोधकांशी विचाराने सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्यासिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
आयएनएस विक्रांतचा घोटाळा भाजपाच्या नेत्यांकडून झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आज महाराष्ट्रात गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले. हा संताप आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले केले जात आहेत. ही नमर्दानगी आहे. याविरुद्ध हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावले पडतील, तशी आमची पावले पडतील असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
भाजपाचे लोक आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे असे देखील राऊत म्हणाले. या आरोपांचे किरीट सोमय्यांकडे उत्तर असू शकत नाही. मी पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. राज्यसभेत त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत. या विषयावरून राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *