काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, त्यांच्या ताफ्यवर दगडफेक करू अशी धमकी शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी इशारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आमच्यासाठी आधी सावरकर आणि हिंदुत्व असे वादग्रस्त वक्तव्य करत राहुल गांधी यांना बाळा दराडे यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली.
महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा पक्ष हा घटक पक्ष आहे. मात्र अशा वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत.
शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दलच्या वक्तव्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. दराडे यांनी मविआ सरकारवर टीका केली करत सावरकर आणि हिंदुत्व हे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांना माफीवीर म्हणून संबोधलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरी शैलीमध्ये सुनावलं होतं. पण आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांना समन्सही बजावण्यात आलं आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, असा थेट इशारा दिला.
नाशिकचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चोख प्रत्युत्तर देत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सोम्या-गोम्याच्या धमक्यांना भीक घालत नाही असे सांगितले.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी व वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. शहीद कुटुंबाचा वारसा असलेले राहुल गांधी अशा सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाहीत. राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ताच चोख उत्तर देईल, असा सणसणीत प्रत्युत्तरही यावेळी दिले.
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललेले नाहीत, अपशब्द वापरलेले नाहीत, इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. सावरकर यांच्याबद्ल जर समिक्षाच करायची असेल तर आतापर्यंत अनेक तज्ञ, इतिहासकार, विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे तेही पहावे. भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण शौरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे, तेही पहावे व त्यावर बोलावे. एकट्या राहुल गांधी यांच्यावर टीका करून त्यांना धमक्या देऊन काही साध्य होणार नाही, अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे, असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya