माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, माणगाव नगरपंचायतीमधील ४५, तळामधील ६९ आणि म्हसळा मधील ४० (जि. रायगड) नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलापासून वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या एकूण १५४ घरकुलांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. या घरकुलासंदर्भातील निधी तसेच पात्र लाभार्थ्यांच्या मान्यतेसाठी करावयाची कार्यवाही कालमर्यादेत करावी.
प्रत्येक लाभार्थ्यास रुपये २.५० लाख प्रमाणे घरकुल अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांचा विचार करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्रदान करण्यात यावा. या योजनेमुळे शहरी भागातील आदिवासी कुटुंबांना सुरक्षित निवाऱ्याचा लाभ मिळणार आहे.
बैठकीस आदिवासी विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके, अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम, तळा तहसिलदार स्वाती पाटील, माणगाव उपनगराध्यक्षा रिया उभारे, आनंद यादव, लक्ष्मी जाधव, दिलीप जाधव, ॲड. उत्तम जाधव, नाना भुवड, जगदिश शिंदे, नागेश लोखंडे, किशोर शिंदे, परशुराम कदम, अलिम पल्लवकर, लक्ष्मण हिलम, विजय तांबे, शाहीद उके, आदी उपस्थित होते.
Marathi e-Batmya