सुप्रिया सुळे यांची मागणी, पहलगाम प्रकरणी सर्वपक्षियांना बोलावून माहिती द्या कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी याचा करावा तेवढा निषेध कमीच

जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, वन नेशन, वन इलेक्शन विषयावर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बैठकीदरम्यान जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील घटनेबाबत माहिती मिळाली. यानंतर काही वेळात मला पुण्यातील सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पुण्यातील दोन नागरिकांना गोळ्या लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांशी संपर्क साधून माहिती घेतली आणि केंद्राकडे तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल. जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करावीत असेही सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काश्मीरमधून परतणाऱ्या पर्यटकांना जास्त दराने तिकीटे घ्यावी लागत आहेत, त्यामुळे रेल्वे आणि विमान वाहतूक मंत्रालयाने या समस्येवर मार्ग काढावा. सध्या अनेक भारतीय नागरिक विविध भागांत अडकले असून, त्यांचं सुरक्षितरित्या घरी पोहोचणं हेच सध्या सर्वात महत्त्वाचं आहे. ही काही नफा कमावण्याची वेळ नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांची असून शासन आणि प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. संपूर्ण घटनेबाबतची माहिती मिळेपर्यंत संयम, सहकार्य आणि जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन सर्वसामान्य नागरिकांना केले.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंधरा दिवसापूर्वी गृह मंत्रालयाला दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती मिळाली होती, अशी चर्चा होत आहे. कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची गृहमंत्रालयाने सविस्तर माहिती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व घडामोडींची माहिती घेतल्यानंतर तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांना योग्य माहिती द्यावी अशी मागणी केली.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *