सुप्रिया सुळे यांचे आश्वासन, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही ७७ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात उत्साहात संपन्न

देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जर शेती, शेतकरी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ठामपणे त्याविरोधात उभा राहील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालय, मुंबई येथे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल सुप्रिया सुळे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासह इतर सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशाचे संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केले. तसेच यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताचा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, आयटी सेल राज्यप्रमुख नीरज महांकाळ, प्रदेश चिटणीस भालचंद्र शिरोळे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, सेवा दलाचे गिरीश सावंत, भगवान पवार, मुबारक खान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात उत्तम संविधान आपल्याला दिले आहे. संविधान समितीने जगाला एक व्यापक विचार दिलेला आहे. संविधानामध्ये अनेक प्रश्नांचे उत्तर बाबासाहेबांनी लिहून दिलेले आहे. जेव्हा जेव्हा देशावर संघर्षाची वेळ येते त्या संघर्षावर कशाप्रकारे मात करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले असल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक आज साजरा होत आहे. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्यांची आठवण आपण काढली पाहिजे. या जगातील सर्वोत्तम संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले. संविधानाने सगळ्यात मोठा अधिकार दिला तो म्हणजे मताचा अधिकार अगदी पंतप्रधान असू दे किंवा सामान्य नागरिक असू दे प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी संविधानावर हल्ला होईल काय अशी परिस्थिती झाली होती. ज्यांनी ज्यांनी संविधानाच्या विरोधात भाषा केली त्यांना जागा दाखवण्याचं काम मतदारांनी केल्याचंही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशाचा आणि राज्याचा जो काही विकास होईल तो संविधान केंद्रबिंदू ठेवूनच झाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा संविधान हेच केंद्रबिंदू ठेवून काम करतो. देशाच्या विकासात संविधानाची भूमिका महत्त्वाची असल्याचेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, देशातील काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आपण लढलं पाहिजे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. त्याकरिता आपण लढलो पाहिजे. हा देश लोकशाही पद्धतीनेच चालणार; इथे दडपशाहीला आम्ही थारा देणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

दावोस येथील गुंतवणूकीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्याच राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असतात. नेमकं आपल्या राज्याच्या पदरी काय पडलं? हे पाहण महत्वाच आहे. कारण मागच्या वर्षी जे करार झाले त्याच पुढे काय झालं? किती गुंतवणूक झाली? किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? हे पाहण महत्वाच आहे. दावोसला जाण्याबाबत माझी हरकत नाही. मात्र जगात जे सुरू आहे, त्यामुळे मला चिंता वाटत आहे. जगातील काही देशांची काय परिस्थिती झाली हे सगळ्यांच्या समोर असल्याचेही यावेळी सांगितले.

यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात अनेकांनी इकॉनोमी मध्ये अर्थ क्षेत्रामध्ये धोरणात्मक बदल केले नृत्य निर्णय घेतले. आणि त्यात सगळ्यात अग्रेसर राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. आज खास करून कैलासवासी आर. आर. पाटील यांचा उल्लेख करते. या देशात स्वच्छतेचे काम सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सुरू केलं असेल तर तो नेता म्हणजे आर आर पाटील असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक काळ असा होता की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे आपल्याला काही फरक पडत नव्हता. पण आता काळ बदलला आहे. रोज सकाळी उठून ट्रम्प काय बोलले किंवा त्यांनी काय केलं हे पहावं लागतं. पण अमेरिका आणि भारत यांच्या नात्यांमध्ये शेतीला घेऊन कोणताही कॉम्प्रमाईज केला जाणार नाही. लोकांच्या आशीर्वादाने सात खासदार निवडून आले. आपले सातही खासदार पार्लमेंट मध्ये अतिशय उत्तम चांगलं काम करतात. त्यांनी सांगितले आहे की अमेरिकेसोबत कोणताही नातं करा हरकत नाही पण शेतीला घेऊन कॉम्प्रमाईज करायचं नाही. एक वेळ रस्त्यावर उतरू पण शेतीला धरून कोणताही कॉम्प्रोमाइज नाही असेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाणारे निर्णय, टॅरिफ धोरणे किंवा व्यापार करारांचा फटका थेट भारतीय शेतीला बसू नये, यासाठी आम्ही सतत आवाज उठवत आहोत. शेतमालाच्या किमती, उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यांचा समतोल राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने आज शेतकरी संकटात सापडलेला दिसतो.ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेण्यात आले, त्याला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर राजकारण न करता एकत्र येण्याची भूमिका आमच्या पक्षाने कायम घेतली असल्याचेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्याची मूल्ये जपण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. संविधानाच्या चौकटीत राहून सर्वसामान्यांच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील. राज्यात १२ जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे, काही ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, तर काही ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढत आहेत. आम्ही याबाबत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे. आता कराडला सगळे तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावर सगळे आहेत. काही ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढत आहेत, एक वेगळं मॉडल आम्ही केलं असल्याचेही यावेळी सांगितले.

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आमदार विलास तरे यांचा विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशी व कारवाईचे आदेश

वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *