सुप्रिया सुळे यांची मागणी, दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबियांना शौर्य पुरस्कार द्या कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी द्या

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे असे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील ६ व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिचे कायद्याचे शिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्यावी असे अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,’जम्मू काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करुन दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने हे तिघे जण, पनवेल येथे राहणारे दिलिप देसले, पुण्यामध्ये राहणारे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे मरण पावले. या घटनेमुळे देशातील जनमानस शोकसंतप्त आहे. ही घटना आपल्या भारतावर झालेला हल्ला असून या दहशतवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरीक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘या घटनेचे वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरिकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही करवली जात नाही. आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना दहशतवादी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबियांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखविलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसं डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखविणे सोपे नाही. ‘म्हणूनच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे. तसंच,’याच धर्तीवर इतर पिडीतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणीही केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याचबरोबर, काश्मीरमधील परिस्थिती बदलण्यासाठी व पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. दहशतवादाला न घाबरता काम करण्याची गरज आहे. तसंच, मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाले होते, मात्र सोमवारी मुंबई परत रुळावर आली होती. त्यामुळं जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी व दहशतवादापासून दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करण्याची, प्रयत्न करण्याची गरज आहे. दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पडण्याची गरज आहे, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही मतही व्यक्त केलं.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की,केंद्र सरकारनं बैठकीत अनेक गोष्टी सांगितल्या. केंद्र सरकार या हल्ला प्रकरणात योग्य ती पावलं उचलेल, असा मला विश्वास आहे. राज्य सरकारनं माणुसकीच्या नात्यानं या कुटुंबासाठी जे काही करता येणं शक्य आहे, ते करण्याची गरज आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारला व गृहमंत्र्यांना आव्हान देत आहेत. त्यामुळं त्यांचे प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची गरज आहे. मोठ्या संख्येनं परदेशी नागरिक भारतात राहत असतील तर त्याबाबत त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारावेत. आम्ही सध्या यावर टीका करणार नाही, मात्र भाजपाचे स्वतःचे खासदार टीका करत असतील तर ती वेगळी गोष्ट आहे, ही तू तू मैं मैं करण्याची वेळ नाही. आम्ही पक्षातर्फे केंद्र सरकारला शब्द दिला आहे. त्यामुळं पुढील काही दिवस आम्ही टीका करणार नाही, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य मी ऐकलेले नाही. मात्र, भाजपाच्या जाहीरनामामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलेले आहे, त्याची प्रत मी झिरवळ यांना पाठवून देईन, मग त्यांच्या लक्षात येईल, ईडीच्या कार्यालयात लागलेल्या आगीवर पहिल्या पंधरा मिनिटात नियंत्रण मिळवण्यात का अपयश आलं? त्या इमारतीमध्ये फायर सुरक्षा नव्हती का?, या परिसरात वर्दळ नसल्यानं ओपन स्पेस आहे, असं असताना आग विझवण्यासाठी वेळ का लागला?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसंच जी कागदपत्रं जळाली असा दावा केला जात आहे, त्याचा बॅकअप आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. ज्या फाईल जळाल्या असतील, त्याचा बॅकअप असणे आवश्यक आहे, बॅकअप नसेल तर ते धक्कादायक ठरेल, अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र ठरवलं होतं की, पुढील काही दिवस सोशल मीडियावर कोणतीही अशी वक्तव्ये करायची नाहीत, ज्यामुळे देशात कटुता वाढेल किंवा देशाच्या ऐक्याला धक्का बसेल. मी महाराष्ट्रातील मीडियाचे मनःपूर्वक आभार मानते आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करते. पहलगाममधील अनेक फोटो जरी समोर आले असले, तरी वेदना वाढवणारे फोटो कोणत्याही मीडिया हाऊसने किंवा चॅनेलवर प्रसारित केले नाहीत.पुरंदरला विमानतळ व्हावे, अशी आमची सर्वांचीच आग्रहाची भूमिका आहे. आमची महाराष्ट्र सरकारकडे एवढीच विनंती आहे की, जबरदस्ती करू नका; जे कराल तर प्रेमाने आणि सन्मानाने करा. ड्रग्स हा खूप गंभीर विषय आहे. मी अनेकवेळा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, जर तुम्ही ड्रग्सविरुद्ध ताकदीने लढणार असाल, तर या सरकारसोबत आम्हीही ताकदीने सहकार्य करून ‘ड्रग्समुक्त महाराष्ट्र’ घडवण्यासाठी प्रयत्न करू असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *