खासदार डॉ अमोल कोल्हेंचा संसदेत माईक बंद करण्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेची झोड

महाराष्ट्रातील सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत हीच समस्या महाराष्ट्राच्या मनात आहे अशा खोचक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवार यांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार होईलच परंतु शरद पवार स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आलेली आहे. त्यांनाही लक्षात आले आहे काय होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता सीमा भागात आहे. त्या जनतेला त्रास दिला तर महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे हा एक मोठा संदेश शरद पवारांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त अनुचित प्रकार करण्याचे धाडस त्यांचे होणार नाही, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

सीमा भागातील वादाबाबत खासदारांना बोलू देण्यात आले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्याचे पाप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास व्हायला लागला आहे. भाजपाच्या सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना थांबवले ही गंभीर व निषेध करणारी बाब आहे असेही त्यांनी सांगितले.

सध्या लोकभावनेचा उद्रेक झालेला आहे. लोकं सरकारच्या विरोधात गेली आहेत. सीमा प्रश्नावरुन राज्यातील काही गावातील लोकं कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यात जातो बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्रात कधीच झाला नाही. एकनाथ शिंदेचे सरकार महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. त्या भागातील जनतेला या सरकारबद्दल अविश्वास वाटायला लागला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मोर्चाला फार मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाबाबत १७ व १८ एप्रिलला सुनावणी संबधित व्यक्तींनी १५ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *