जयंत पाटील यांचा टोला, म्हणून मुख्यमंत्री कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत शिवसेनेचे नाहीतच ते भाजपाचेच मुख्यमंत्री...

राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही असे स्पष्ट करतानाच सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांवर करत त्यामुळे ते कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत हीच समस्या महाराष्ट्राच्या मनात आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी वरील टोला लगावला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवारसाहेबांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार होईलच परंतु पवारसाहेब स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आलेली आहे. त्यांनाही लक्षात आले आहे काय होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता सीमा भागात आहे. त्या जनतेला त्रास दिला तर महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे हा एक मोठा संदेश पवारसाहेबांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त अनुचित प्रकार करण्याचे धाडस त्यांचे होणार नाही असेही ठणकावून सांगितले.

सीमा प्रश्नात महाराष्ट्रातील मराठी लोकांना तिथे त्रास होतो आहे, हल्ले होत आहेत त्याबद्दल आवाज उठवायला लोकसभेत संधी दिली जात नाही. म्हणजे केंद्र सरकारने एवढे एकाबाजूने काम करणे योग्य नाही असा खोचक सल्लाही त्यांनी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिला.

सीमा भागातील वादाबाबत खासदारांना बोलू देण्यात आले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्याचे पाप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास व्हायला लागला आहे. भाजपाच्या सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना थांबवले ही गंभीर व निषेध करणारी बाब आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सध्या लोकभावनेचा उद्रेक झालेला आहे. लोकं सरकारच्या विरोधात गेली आहेत. सीमा प्रश्नावरुन राज्यातील काही गावातील लोकं कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यात जातो बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्रात कधीच झाला नाही. एकनाथ शिंदेचे सरकार महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. त्या भागातील जनतेला या सरकारबद्दल अविश्वास वाटायला लागला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मोर्चाला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे असेही जयंत पाटील यांनी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *